तबला आणि घुंगरू यांचा संवाद

By Admin | Published: June 5, 2017 02:39 AM2017-06-05T02:39:55+5:302017-06-05T02:39:55+5:30

‘तबला’ हे वाद्य नृत्याबरोबर पुष्कळ वाजविले जाते. तबला वादनातील गती आणि नर्तन कलेतील गती नेहमी एकमेकांबरोबर सहजपणे जातात.

Tabla and Ghangaroo's dialogue | तबला आणि घुंगरू यांचा संवाद

तबला आणि घुंगरू यांचा संवाद

googlenewsNext

-अमरेंद्र धनेश्वर
‘तबला’ हे वाद्य नृत्याबरोबर पुष्कळ वाजविले जाते. तबला वादनातील गती आणि नर्तन कलेतील गती नेहमी एकमेकांबरोबर सहजपणे जातात. नर्तनामुळे वादनाला आणि वादनामुळे नर्तनाला सहज उठाव येतो. बिरजू महाराजांचे नृत्य पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. तालाचे विविध खंड पाडून अथवा विभता करून ते ज्या पद्धतीने नृत्याच्या भाषेतून त्यांना पेश करतात ते अक्षरश: खिळवून टाकणारे असते. आणि त्यांच्याबरोबर किशन महाराज, सामता प्रसाद, झाकिर हुसेन, कुमार बोस यांच्यासारखे तबलावादक संगतीला असले की त्या नर्तन/वादनाला अक्षरश: दिव्यत्वाचा स्पर्श होतो.
‘कलामंदिर’ सभागृहात अशाच प्रकारचा अनुभव परवा आला. तबलावादक प्रद्युत मुखर्जी आणि ओडिसी नर्तकी डोना गांगुली यांची ओडिसी/तबला जुगलबंदी आयोजित करण्यात आली होती. प्रद्युत हे पंजाब घराण्याचे तबलावादक आहेत. त्यांचा ‘रिदम एक्स्प्रेस’ हा कार्यक्रम तुफान चालतो. तो प्रामुख्याने तालवाद्यांचा आहे. डोना गांगुली या माजी क्रिकेटपटू कर्णधार सौरभ गांगुली यांच्या पत्नी. त्यांनी ओडिसीचे प्रशिक्षण दस्तुरखुद्द गुरू केलचरण महापात्र यांच्याकडून घेतले आहे.
या दोघांची जुगलबंदी प्रेक्षणीय आणि श्रवणीय होती. प्रद्युत यांचा हात अत्यंत तयार आणि साफ आहे. डोना गांगुलींचा पदन्यास सुरेख आहे. या दोघांच्या मिलाफामुळे प्रेक्षक/श्रोते पूर्णपणे गुंगून गेले. अशी जुगलबंदी हा एक आगळावेगळा आणि आनंददायक अनुभव असतो.
आपटे/आठल्ये यांची मैफल ‘कलाभारती’ आणि ‘ख्याल ट्रस्ट’च्या वतीने रविवारी ११ जून रोजी कर्नाटक संघ (माटुंगा प.रे.) या ठिकाणी सकाळी १० ते १ या वेळात आयोजित करण्यात आली आहे.
त्यात आदित्य आपटेंचे सरोदवादन आणि डॉ. गायत्री आठल्ये यांचे गायन रसिकांना ऐकता येईल. आदित्य आपटे हे प्रदीप बारोट यांचे शिष्य आहेत. आकाशवाणीच्या अखिल भारतीय स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले
आहे.
शिवाय महाराष्ट्र सरकारने भीमसेन जोशी शिष्यवृत्तीसाठीही त्यांची निवड केली आहे. डॉ. गायत्री आठल्ये या श्रीकृष्ण हळदणकर आणि नीला भागवत यांच्या शिष्या आहेत. तनय रेगे (तबला) आणि विनोद पडगे (हार्मोनियम) साथसंगत करणार आहेत.
‘स्वरमाउली’ कार्यक्रम
‘स्वरमाउली’तर्फे विलेपार्ले (पू.) येथील सावरकर केंद्रात ११ जून रोजी हर्षवर्धन कौलगी (बासरी) आणि अल्पना रॉय (ठुमरी) असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ५.३० ते ८.३० अशी कार्यक्रमाची वेळ आहे आणि सर्वांना हार्दिक निमंत्रण देण्यात आले आहे.

Web Title: Tabla and Ghangaroo's dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.