कायद्याचं बोला !
By Admin | Published: April 9, 2017 01:19 AM2017-04-09T01:19:36+5:302017-04-09T01:19:36+5:30
""तू चीज बडीं है मस्त मस्त"" म्हणत अभिनेत्री रवीना टंडन हिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या रवीनाने आपल्या भूमिकांनी
- Suvarna Jain
""तू चीज बडीं है मस्त मस्त"" म्हणत अभिनेत्री रवीना टंडन हिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या रवीनाने आपल्या भूमिकांनी रसिकांवर जादू केली आहे. सिनेमासह छोट्या पडद्यावरही रवीना रिअॅलिटी शोची जज म्हणून नव्या भूमिकेत पाहायला मिळतेय. सिनेमा, छोटा पडद्याच्या माध्यमातून रवीनाने वेगळी छाप पाडलीच आहे. तसंच विविध सामाजिक विषयांवर रवीना कायम भूमिका मांडत असते. "सबसे बडा कलाकार" या शोच्या निमित्ताने रवीनाशी मारलेल्या या खास गप्पा...
तुझ्या मते कलाकार हा कसा असावा?
- "सबसे बडा कलाकार" या रिअॅलिटी शोमध्ये एका आॅलराऊंडरच्या शोधात आहोत. आजच्या युगातील मुलं बरीच हुशार आहेत. कॉमेडी, डान्स, गायकी अशा विविध क्षेत्रांत ही मुलं पारंगत आहेत. अशा कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हा शो उत्तम पर्याय आहे. या शोमधील सगळे स्पर्धक खूप लहान आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा नसून आपली कला सादर करण्यासाठीचं उत्तम व्यासपीठ आहे, असं आम्ही त्यांना समजावून सांगतो. बालपणातच मुलांना स्पर्धेत ढकलू नका, असं आम्ही पालकांना समजावून सांगतो. स्पर्धात्मक युगात मुलांना ढकलण्यापेक्षा त्यांचं बालपण टिकून राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं मला वाटते. त्यामुळे मनोरंजन एके मनोरंजन अशा रीतीने या शोमधील मुलं आपली कला सादर करताना दिसतील.
मुलांना जज करणे, त्यांच्या वयानुसार समजावणं किती आव्हानात्मक आहे?
- "बच्चे दिल के सच्चे" असं आपण म्हणतो. लहान मुलांसोबत धम्माल मस्ती करतो. लहान मुलं इतकी निरागस असतात, की त्यांचं बोलणं ऐकून आपण कधीकधी लोटपोट होतो. त्यांच्या सादरीकरणात तर कधी कधी इतकी ताकद असते की त्यातून बरंच शिकायलाही मिळतं. जे आपल्याला इतक्या वषार्नंतरही कळलेलं नाही, समजलेलं नाही त्या गोष्टी ही मुलं खूप सहजगत्या सांगून जातात. त्यांच्यासोबत घालवलेला मी प्रत्येक क्षण खूप एन्जॉय करते. त्यांच्यासोबत राहून राहून मला माझं बालपण आठवतं.
दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येतात. सामाजिक आशय असलेले सिनेमा तू केलेले आहेस. तुझा आगामी सिनेमाही याच विषयावर भाष्य करणारा आहे का?
सध्या देशभर महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती महिला अत्याचाराची बातमी कानांवर पडते. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना जणू काही कायद्याची भीती, जरब राहिली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उघडपणे, दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात. तरीही कित्येक वर्षे पीडितांना न्याय मिळत नाही. वर्षानुवर्षे खटले सुरूच राहतात. या सगळ्या गोष्टींवर आधारित "मातृ द मदर" हा सिनेमा भाष्य करतो. रिअॅलिटीमध्ये कधीही घडली नसेल, अशी कथा या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलीय. सिनेमाची कथा काल्पनिक असली तरी कधी ना कधी ती प्रत्यक्षात घडू शकते. त्यामुळे आपल्या कायद्यामध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे. यावर हा सिनेमा भाष्य करतो.
देशात महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, असं तुला वाटतं?
महिलांवर आजही अत्याचार सुरू आहेत ही लाजिरवाणी बाब आहे. हे अत्याचार कमी होण्यासाठी लोकांच्या विचारसरणीत बदल होणं गरजेचे आहे. नेतेमंडळी, लोक बऱ्याचदा अशा प्रकरणात पीडितेलाच दोषी धरतात. अमुक वेळेला ती बाहेर का पडली, तिने विशिष्ट कपडे का घातले असे सवाल विचारले जातात. त्यामुळे बलात्कार पीडितेला सवाल न विचारता, तिच्यावर शंका न घेता ज्यांनी हे दुष्कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कायदे कडक व्हायला हवेत. कायदे असे व्हावेत, की भविष्यात कुणीही अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी धजावणार नाही. कायदा हातात घेऊ नये असं मी सांगेन. हा एक सिनेमा आहे, एक कथा आहे; मात्र कोणत्याही घटनेवर उपाययोजना नाही. त्यामुळे कायदा हातात घेऊ नका आणि कायद्याचं पालन करा, असंच मी सांगेन.