'विजय म्हणजे माझं...'; अखेर तमन्नाने दिली प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:10 PM2023-06-13T13:10:38+5:302023-06-13T13:11:34+5:30
Tamannaah bhatia: लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2)च्या सेटवर तमन्ना आणि विजय यांची पहिली भेट झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamannaah bhatia) आणि विजय वर्मा (vijay varma) यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले. तेव्हापासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. अलिकडेच विजय वर्मानेदेखील त्यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. मात्र, तो कुठेही स्पष्टपणे बोलला नव्हता. अखेर तमन्नाने या नात्यावर उघडपणे भाष्य केलं असून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2)च्या सेटवर तमन्ना आणि विजय यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर या दोघांचा गोव्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ही जोडी एकमेकांना किस करत होती. तेव्हापासून त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु झाली. या चर्चांवर अखेर तमन्नाने मौन सोडलं आहे. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत तिने भाष्य केलं.
"विजय वर्मासोबत माझं आपोआप छान बॉण्डिंग तयार होत गेलं. प्रचंड मेहनत करुन यशस्वी झालेल्या स्त्रियांचा एक प्रॉब्लेम असतो. त्यांना सतत असं वाटतं की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. पण, तसं नसतं. काही गोष्टी सहज मिळतात. यातून एक लक्षात येतं की काही गोष्टी सहजपणे फारशी मेहनत न करता मिळतात", असं तमन्ना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मैत्री ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मित्रासोबत मज्जेत, जोरजोरात हसू शकता. सगळं त्याच्यासोबत शेअर करु शकता. विजय माझं हॅप्पी प्लेस आहे. मला मनापासून त्याची खूप काळजी वाटते. आपल्या देशात एक प्रॉब्लेम आहे. मुलीला तिच्या जोडीदारासाठी तिचं संपूर्ण आयुष्य बदलावं लागतं. त्या माणसासाठी मुलीला खूप काही गोष्टी कराव्या लागतात. पण, विजय तसा नाही. तो मला, माझ्या सवयींना आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला नीट समजून घेतो."