या कारणामुळे मेरे साईमधील सगळे कलाकार आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 11:13 AM2018-10-24T11:13:44+5:302018-10-25T06:00:00+5:30
आगामी महत्त्वपूर्ण भागासाठी तरुण खन्ना, स्नेहा वाघ, सिद्धान्त कर्णिक, फ्लोरा सैनी हे सर्व कलाकार पुन्हा एकदा मेरे साई या मालिकेसाठी एकत्र येणार आहेत.
छोट्या पडद्यावरील कलाकार अनेकवेळा 10-12 तास मालिकांचे चित्रीकरण करतात. महिन्यातले 20-25 दिवस तरी त्यांचे चित्रीकरण सुरू असते. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांपेक्षा जास्तीत जास्त वेळ हा मालिकेच्या सेटवर घालवता. त्यामुळे सगळ्या कलाकारांमधील नाते खूप घट्ट असते. जेव्हा एखाद्या कलाकाराची मालिकेतील भूमिका संपते आणि त्याला दुसर्या कामासाठी बाहेर पडावे लागते, तेव्हा हे निरोप घेणे खूप अवघड होते आणि तेव्हा कोणालाच हे माहीत नसते की पुन्हा त्यांची भेट कधी होईल. गेल्या वर्षांपासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिका साई बाबा यांचे जीवन चरित्र सादर करून सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रत्नाकरची भूमिका साकारणारा तरुण खन्ना, शारीरिक पिडांनी ग्रासलेली तुळसा साकारणारी स्नेहा वाघ, रंगमंच कलाकार सादर करणारा गणपतराव म्हणजेच सिद्धान्त कर्णिक, एक कलात्मक नृत्यांगना सुवर्णाबाईची भूमिका साकारणारी फ्लोरा सैनी हे सर्व आपापल्या व्यक्तिरेखांमुळे कधी ना कधी तरी या सुंदर मालिकेचा भाग बनले होते. आगामी महत्त्वपूर्ण भागासाठी हे सर्व कलाकार पुन्हा एकदा मेरे साई या मालिकेसाठी एकत्र येणार आहेत.
रत्नाकर, तुळसा, सुवर्णाबाई, गणपतराव या सर्व व्यक्ती साईबाबांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा मालिकेत येणार आहेत. कारण साईबाबा 72 तासांसाठी ध्यानमग्न झाले आहेत. साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष सर्वत्र साजरे होत आहे, त्याचवेळी मालिकेत त्यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या अध्यायाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. या कथानकाबद्दल बोलताना स्नेहा वाघ म्हणजे तुळसा सांगते, “पुन्हा एकदा मेरे साई या मालिकेत काम करताना मला आनंद होत आहे. प्रेक्षकांना तुळसाची व्यक्तिरेखा आवडली होती आणि मालिकेतील माझ्या कामाचे कौतुक करणारे प्रेक्षकांचे संदेश देखील मला मिळाले आहेत. मला मेरे साई मालिकेत काम करायला खूप मजा आली होती. सर्व कलाकार आणि इतर क्रू सदस्य खूपच स्नेहशील आणि मदत करणारे होते. साईबाबांच्या जीवनचरित्रात समाधी घेण्याची घटना खूपच महत्त्वाची होती. मला आठवते आहे की, माझी आजी मला सांगायची की साईबाबांचे एक भक्त जे सतत त्यांच्यासोबत राहत असत, त्यांच्याकडून तिने साईबाबांबद्दल ऐकले होते. मला पुन्हा एकदा मेरे साईचा भाग होण्याची संधी मिळाली ही साईबाबांचीच कृपा आणि त्यांचे आशीर्वाद आहेत.”