कॉर्पोरेट कंपन्यांचा बॉलीवूडला टाटा
By Admin | Published: January 14, 2016 02:41 AM2016-01-14T02:41:36+5:302016-01-14T02:41:36+5:30
कॉर्पोरेट घराण्यांनी दोन दशकाआधी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने हिंदी चित्रपट विश्वाची दशा आणि दिशा पार बदलून गेली. मोठ्या रकमेबरोबरच मोठे स्टार आणि नामवंत
कॉर्पोरेट घराण्यांनी दोन दशकाआधी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने हिंदी चित्रपट विश्वाची दशा आणि दिशा पार बदलून गेली. मोठ्या रकमेबरोबरच मोठे स्टार आणि नामवंत दिग्दर्शकांना सोबत घेऊन या कॉर्पाेरेट घराण्यांनी खाजगी निर्मात्यांसाठी एकप्रकारे बॉलीवूडचा मार्गच बंद करून टाकला. परंतु हे चित्र फार दिवस टिकले नाही.
इरोज पासून यूटीवी, वाईकाम आणि हॉलीवूडमधून आलेले स्टार फॉक्ससारख्या घराण्यांनी फिल्म मेकिंग आणि मार्केटिंगला एक वेगळी दिशा दिली. परंतु काहीच वर्षांत हे चित्र बदलायला लागले. बघता बघता बऱ्याच कंपन्यांनी पॅकअप केले बॉलीवूडला टाटा करीत या क्षेत्रात आपली गुंतवणूक थांबवली. यामध्ये टाटा इनफो, के सेरा सेरा, निंबस, अप्लॉज, मैटालाइट, आईड्रीम, पैंटालूम, परसेप्ट पिक्चर्स, सहारा, श्री अष्टविनायक आणि मनमोहन शेट्टीची कंपनी एड लॅबचा समावेश आहे. आता तर रिलायंस, पैन, पीव्हीआर यांनीदेखील चित्रपट निर्मिती क्षेत्रातून काढता पाय घेतला आहे. या कंपन्या आता फक्त मार्केटिंग व डिस्ट्रिब्यूशनपर्यंतच मर्यादित झाल्या आहेत. मार्केटिंग, डिस्ट्रिब्यूटशनपासून प्रोडक्शनपर्यंत सक्रिय कंपन्यांमध्ये यूटीव्ही, ईरोज आणि वाईकामशिवाय फॉक्स स्टारचेही नाव आहे. बॉलीवूडमधून मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी काढता पाय घेण्याचे कारण एक नाही. याला अनेक कारणे आहेत. या कंपन्यांनी येथे दोन आणि दोन चारचा फॉर्म्युला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्या अपयशी ठरल्या. ज्या कंपन्या टिकल्या आहेत त्याही साम, दाम, दंड भेदासह सर्व हातखंडे वापरून काम करताना दिसत आहेत.
- anuj.alankar@lokmat.com