'हिंदी मालिकेची कॉपी' म्हणणाऱ्यांना तेजश्री प्रधानचं सडेतोड उत्तर, "विश्वास ठेवा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 01:10 PM2023-08-23T13:10:08+5:302023-08-23T13:12:36+5:30

मला असं वाटतं की एखादी गोष्ट रिमेक असते पण...

tejashree pradhan reacts to trollers who are saying her new serial is remake of hindi serial | 'हिंदी मालिकेची कॉपी' म्हणणाऱ्यांना तेजश्री प्रधानचं सडेतोड उत्तर, "विश्वास ठेवा..."

'हिंदी मालिकेची कॉपी' म्हणणाऱ्यांना तेजश्री प्रधानचं सडेतोड उत्तर, "विश्वास ठेवा..."

googlenewsNext

'होणार सून मी या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आता तिच्या आगामी 'प्रेमाची गोष्ट' मालिकेमुळे चर्चेत आहे. तेजश्रीची याआधी 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका गाजली होती. आता दोन वर्षांनंतर ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतली आहे. तेजश्रीची नवी मालिका म्हणत प्रेक्षकांमध्ये उत्साह होता. मात्र जेव्हा मालिकेचा पहिला प्रोमो आला तेव्हा अनेकांची निराशाच झाली. कारण हिंदी लोकप्रिय मालिका 'ये है मोहोब्बते' चीच ही मालिका कॉपी असल्याचं दिसलं. यावर अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केलं गेलं. आता तेजश्रीने यावर एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

हिंदीत 'ये है मोहोब्बते' ही मालिका खूपच लोकप्रिय होती. दिव्यांका त्रिपाठी या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. अगदी तशीच कथा तेजश्रीच्या मालिकेची दिसत आहे. यावरुन तिला ट्रोल केलं गेलं असता तेजश्री म्हणाली, "हो हा नक्कीच रिमेक आहे त्यात काही दुमत नाही. कोणी नाकारतही नाही.  मला असं वाटतं की एखादी गोष्ट रिमेक असते पण आपण शब्दश: भाषांतर करत नाही. प्रत्येक भाषाचं, संस्कृतीचं आपलं एक वैशिष्ट्य असतं. त्या भाषेची वेगळी गोडी असते, गंमत असते. ते डोक्यात ठेवूनच लेखक लिहितात."

ती पुढे म्हणाली, "तुम्ही पहिल्या काही एपिसोड्सची तुलना केली तर ते तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे रिमेक हा केवळ धागा आहे मात्र तो धागा घेऊन जी बांधणी होते ती आपल्या मराठी प्रेक्षकांना आवडेल, समजेल, आपलीशी वाटेल या गोष्टींचा विचार करुन केली जाणारी मालिका असणार आहे. हे मी तुम्हाला खात्रीनिशी सांगू शकते माझ्यावर विश्वास ठेवा कारण पहिले काही मालिकेचे भाग बघतानाच तुम्हालाही हे जाणवेल की अरे खरंच हे काहीतरी वेगळं आहे." 

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तर अपूर्वा नेमळेकर मालिकेत खलनायिका साकारत आहे. 

Web Title: tejashree pradhan reacts to trollers who are saying her new serial is remake of hindi serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.