"महाराष्ट्र ही संतांची-वीरांची भूमी", सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:26 PM2024-11-18T13:26:49+5:302024-11-18T13:27:37+5:30
पवन कल्याण यांनी महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नांदेड अशा विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत.
Telegu Superstar Pawan Kalyan : राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी पुर्ण जोर लावण्यात येत आहे. मोठ्या मोठ्या सेलिब्रेटींना बोलवण्यात येत आहे. आता महायुतीकडून थेट सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचा उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आलं.
पवन कल्याण यांनी महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नांदेड अशा विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. या सभांना उदंड प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. या सभांमध्ये पवन कल्यान यांनी थेट मराठीत संवाद साधला. प्रचार सभेत जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अशी घोषणा देत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. अगदी काही मिनिटांच्या मराठी संवादाने त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली. त्यांनी मराठी बोलताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्याचं पाहायला मिळालं.
प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी संतांची भूमी आणि वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र. या सर्वांना माझे नमन. लाडक्या भावांना, लाडक्या बहिणींना नमस्कार करतो. जास्त बोलण्याआधी मी सर्वांची माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय. कारण, मी या भाषेचा सन्मान करतो. त्यामुळे चुकलं तर माफ करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं, याचा मला आनंद आहे. रामराम महाराष्ट्र. या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे. स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे".
छत्रपती शिवाजी महाराजांची, शूरवीरांची आणि संतांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र#VarasaVikasacha#वारसा_विकासाचा#SreejayaForBhokar#MissionBhokar#लाडकीबहिणश्रीजयाताई
— Adv. Sreejaya Ashok Chavan (@SreejayaAChavan) November 17, 2024
#Sreejayaashokchavan#Ardhapur#Bhokar#Mudkhed#nanded#mla#sreejayaforbhokar#sreejayachavan#Ashokchavan… pic.twitter.com/lu5ArF0G4C
राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यानंतर काही दिवसातच राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.