७६ वर्षीय एका मुंबईकराकडे महात्मा गांधींच्या सर्वाधिक वस्तूंचा संग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:36 PM2021-05-24T19:36:29+5:302021-05-24T19:36:54+5:30
महात्मा गांधींच्या सर्वाधिक वस्तू असलेले खासगी संग्राहकाचा संग्रह OMG! ये मेरा इंडिया या शोमध्ये पहायला मिळणार आहे.
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य नेते होतेच, त्याचप्रमाणे त्यांनी जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिली. त्यांचा वारसा सर्वज्ञात आहे आणि त्यांचे विचार आणि शिकवण आजही जगभरातील अनेक देशांमधील लोकांच्या हृदयात आणि मनात कायम आहे. जगभरात गांधींची स्मृतीचिन्हे अनेक ठिकाणी आहेत. महात्मा गांधींच्या वस्तूंची स्वतंत्र वस्तूसंग्रहालयेसुद्धा आहेत. महात्मा गांधींच्या सर्वाधिक वस्तू असलेले खासगी संग्राहक आहेत किशोर झुनझुनवाला.
७६ वर्षीय किशोर झुनझुनवाला मुंबईकर आहेत. हिस्ट्री टीव्ही १८(HistoryTV18) वरील OMG! ये मेरा इंडिया या सोमवारी रात्री ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना महात्मा गांधींच्या अनेक वस्तू, त्यांच्याशी संबंधित मौल्यवान साठा म्हणजेच महात्मा गांधींनी लिहिलेली पत्रे, त्यांचे ध्वनिमुद्रण, त्यांची भाषणे, त्यांची आवडती भजने आणि त्यांच्या राखेचा अंश साठवून ठेवलेली छोटीसी डबीसुद्धा पाहता येणार आहे.
देशभरातील भारतीयांनी साध्य केलेली अतुलनीय कामगिरी, त्यांच्या विस्मयकारक आवडीनिवडी आणि स्तिमित करणारी गुणवत्ता हे पैलू OMG! ये मेरा इंडिया या सीरिजमध्ये दाखविण्यात येतात. या सोमवारी रात्री ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये किशोर झुनझुनवाला यांचा संग्रह दाखविण्यात येणार आहे. त्यात १०० हून अधिक कॅटेगरींमधील २५,००० हून अधिक वस्तू पाहायला मिळणार आहेत. यात दुर्मीळ स्टँप्स आणि नाणी, इतर देशांमधील पदके, जुन्या वर्तमानपत्रांचे दुर्मीळ मूळ अंक इत्यादी अनेक संग्रहांचा समावेश आहे. सांस्कृतिक मंत्रायलायतर्फे मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये या संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आता प्रेक्षक हा मौल्यवान खजिना घरबसल्या पाहू शकणार आहेत.