'अनुपमा'मध्ये मोठा ट्विस्ट, मालिका घेणार लीप!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:17 PM2024-10-11T17:17:40+5:302024-10-11T17:18:13+5:30
Anupama Serial: 'अनुपमा' या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे.
अनुपमा (Anupama Serial) या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची आगळी उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही वर्चस्व गाजवले आहे. ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. खिळवून ठेवणारे नाट्य आणि या मालिकेला मिळणारी नवी वळणे यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची कायम पसंती राहिली आहे.
'अनुपमा' या मालिकेला नेहमीच प्रेक्षकांची मोठी प्रशंसा आणि प्रेम लाभले आहे. असे असताना, आता प्रेक्षकांकरता आणखी एक आश्चर्य उलगडणार आहे, याचे कारण ‘अनुपमा’ ही मालिका चक्क एका पिढीची झेप घेत, नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून, आणखी दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आद्याचे पात्र अलिशा परवीन साकारणार असून, आद्याचा जीव ज्याच्यावर जडला आहे त्या प्रेमची व्यक्तिरेखा शिवम खजुरिया वठवणार आहे.
या मालिकेच्या निर्मात्यांनी अलीकडेच नव्या रूपातील मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात ‘अनुपमा’च्या नव्या प्रवासाची झलक मिळते. यात अनुपमा वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटते आणि ‘अनु की रसोई’ हा तिचा स्वत:चा व्यवसाय चालविण्यात ती व्यग्र आहे. ‘अनुपमा’ला तिच्या कुटुंबाची आठवण येत असते आणि आद्या या तिच्या लेकीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा असते. दुसरीकडे, आद्या आता एक टूर गाईड बनली आहे आणि एके दिवशी आद्या एका मंदिरात प्रेमला भेटते. आद्याला बघताच क्षणी प्रेमला तिची जणू मोहिनी पडते. आद्या नात्यातील गुंतागुंतीचा विचार करत आहे आणि तिच्या आईच्या जगतापासून दूर आहे. एका नव्या, अनोळखी व्यक्तीच्या प्रयत्नाने आई आणि मुलीतील नाते सुधारेल का? मुलीला शोधून काढण्याचे आईचे प्रयत्न सफल होतील का? हे पाहणे कमालीचे ठरेल.