'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत मोठा ट्विस्ट, आता या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:26 PM2022-10-29T12:26:25+5:302022-10-29T12:27:04+5:30
Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath Serial) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. यश, नेहा आणि परी यांच्या सुखी आनंदी आयुष्याला ग्रहण लागले आहे. यश आणि परी नेहाशिवाय जगत आहेत. परी अजूनही आईच्या आठवणीतून बाहेर पडलेली नाहीये, तर यश नेहासाठी झुरत असूनही परीसमोर त्याला त्याचे दु:ख दाखवता येत नाहीये. अशा मनस्थितीत अडकलेल्या परीचं मन रमावं यासाठी चौधरी पॅलेसमध्ये लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
मालिकेत एक वर्षाचा लीप घेण्यात आला आणि आता एक वर्षानंतर परी, यशच्या आयुष्यात काय सुरू आहे, नेहा नेमकी कुठे आहे हे प्रेक्षकांसमोर येत आहे. नुकत्याच झालेल्या भागात नेहा ही अनुष्का मेहता बनून एका गुजराती कुटुंबाची मुलगी बनल्याचे दाखवण्यात आले आहे. अनुष्का ही नेहाच असावी असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. मेहता यांना नेहा कुठे आणि कशी सापडली हे अजून मालिकेत दाखवण्यात आलेलं नाही, पण अनुष्का मेहता बनून नेहा की नेहासारखी दिसणारी मुलगी यश आणि परीच्या आयुष्यात पुन्हा येईल का ही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
दरम्यान परी सतत आईच्या आठवणीत हरवलेली असते. तिला थोडा आनंद मिळावा, ती नेहाच्या दुराव्यातून बाहेर यावी यासाठी सिम्मीने परीला डान्स शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. परीला डान्स शिकवण्यासाठी येणारी टीचर रेवती देसाई हे पात्र आता मालिकेत दिसणार आहे. रेवती आईसोबत राहतेय आणि तिला डान्स अकॅडमी सुरू करायची आहे. चौधरी पॅलेसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. नेहाच्या निधनामुळे यश आणि परीच्या मनस्थितीचा फायदा घेण्यासाठी सिम्मी रेवती देसाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही कट करणार नाही ना अशी शंका नव्या प्रोमोने निर्माण केली आहे.
या मालिकेत एन्ट्री घेणाऱ्या या रेवतीची भूमिका अभिनेत्री नुपूर दैठणकर हिने साकारली आहे. नुपूर दैठणकर ही नृत्यांगना आणि मालिका अभिनेत्री आहे. तिची स्वतःची डान्स अकॅडमी सुद्धा आहे. झी मराठीवरील बाजी या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. नुपुरला नृत्याची गोडी तिच्या आईमुळेच मिळाली . डॉ स्वाती दैठणकर या नूपुरच्या आई, ‘नुपूरनाद ‘ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेतून त्यांनी अनेकांना भरतनाट्यमचे धडे दिले आहेत.