रातोरात सुपरस्टार झालेल्या 'कच्चा बादाम'चा मूळ गायक कोण माहितीये का?; जाणून त्याच्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:55 PM2022-02-01T13:55:29+5:302022-02-01T13:56:25+5:30
Kacha badam: कच्च्या भुईमुगाच्या शेंगांना बंगाली भाषेत काच्चा बादाम म्हटलं जातं. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते एका वेगळ्या अंदाजात आरोळी ठोकतात.
सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. आजवर याच सोशल मीडियामुळे अनेक जण रातोरात सुपरस्टार झाले आहेत. त्यातच सध्या सोशल नेटवर्किंगवर कच्चा बादाम हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. परंतु, हे गाणं नेमकं कोणाचं आहे? त्याचा गायक कोण? असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळे कच्चा बादामचा खरा गायक कोण आणि त्याच्या परिस्थितीविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर #KachaBadam हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी व्हिडीओ,रिल्सदेखील केले आहेत. परंतु, या गाण्याचा मूळ गायक मात्र अंधारातच आहे. हे गाणं भुबन बादायकर (Bhuban Badyakar) यांनी गायलं आहे.
कोण आहे भुबन बादायकर?
भुबन बादायकर हे मूळचे बंगाली असून त्यांनी हे गाणं फेमस केलं आहे. भुबन दररोज त्यांच्या हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकतात. या कच्च्या भुईमुगाच्या शेंगांना बंगाली भाषेत काच्चा बादाम म्हटलं जातं. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते एका वेगळ्या अंदाजात आरोळी ठोकतात. त्यांची हीच आरोळी लोकप्रिय झाली आणि त्यांचं गाण रातोरात व्हायरल झालं.
भुबन हे बीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर येथील कुरालजुरी गावात राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी २ मुले, १ मुलगी असे सदस्य आहेत. भुबन जुन्या वस्तूंच्या बदल्यात भुईमुगाच्या शेंगा विकतात. दररोज ३-४ किलो शेंगांची विक्री करुन ते २००- २५० रुपये कमवतात. परंतु, त्यांचं गाणं व्हायरल झाल्यापासून त्याच्या आर्थिक कमाईमध्येही वाढ झाली आहे.