खंबाटकी घाटात कंटेनर अडकल्याने १ तास अडकून पडले आदेश बांदेकर; म्हणाले- असेच अपघात होत राहिले तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 03:03 PM2024-02-01T15:03:53+5:302024-02-01T15:04:32+5:30
वाई-मुंबई प्रवासादरम्यान आदेश बांदेकरांना तब्बल एक तास खंबाटकी घाटात अडकून राहावं लागलं. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनातही त्यांनी स्थान मिळवलं आहे. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. आदेश बांदेकरांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ते सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. शूटिंगदरम्यानचेही अनेक व्हिडिओ बांदेकर शेअर करताना दिसतात.
सध्या आदेश बांदेकरांच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाई-मुंबई प्रवासादरम्यान आदेश बांदेकरांना तब्बल एक तास खंबाटकी घाटात अडकून राहावं लागलं. बोगद्यात एक कंटेनर अडकल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. याचा व्हिडिओ आदेश बांदेकरांनी शेअर केला आहे. "खंबाटकी घाटातल्या बोगद्यात हा भला मोठा कंटेनर अडकून पडला आहे. त्यामुळे बोगद्यात ट्राफिक झालंय आणि त्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय. त्या चालकाने कोणताही विचार न करता बोगद्यापेक्षा मोठ्या आकाराचा कंटेनर बोगद्यात घेऊन गेला. त्यामुळे नाहक अडचणींचा सामोरं जावं लागलं. असंख्य प्रवासी अडकून पडले. पण, पोलीस आणि प्रवाशांनी तो कंटेनर बाहेर काढला. पण, बोगद्याच्या समोरही एक कंटेनर उलटला होता. हे असे अपघात होत राहिले आणि प्रवासाच्या ठिकाणी खोळंबा झाला. आणि अशात जर एखादी रुग्णवाहिका अडकून पडली. तर तुमच्या आमच्या घरातील एखादा सदस्य या ट्राफिकचा बळी पडू शकतो. देव चालकांना सुबुद्धी देवो", असं ते व्हिडिओत म्हणत आहेत.
या व्हिडिओला आदेश बांदेकरांनी "वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामधे १ तास अडकून रहाणं … हि वेळ कोणावरच येऊ नये … पुन्हा प्रवास सुरू… धन्यवाद खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांना", असं कॅप्शन देत पोलीस आणि क्रेन चालकांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या भूमिका मांडल्या आहेत.