"ठरवून कधीच मी शिर्डीला आलो नाही कारण.", 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची भावुक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:16 AM2024-09-18T10:16:45+5:302024-09-18T10:17:09+5:30
मिलिंग गवळींनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील भावुक आठवण सांगितली आहे (milind gawali, shirdi saibaba)
आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी नुकतेच शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. मिलिंद गवळी लिहितात, ""सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय". काही दिवसापूर्वी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा पुन्हा एकदा योग आला, मन प्रसन्न झालं, माझं साईबाबांशी एक वेगळंच नातं आहे. अगदी अगदी लहानपणापासून, जन्माच्या आधीपासूनच म्हणा ना. माझी आई मला सांगायची की "तू नवसाचा आहेस". "मी बाबांकडे नवस केला होता आणि तुझा जन्म झाला." माझी आई साईबाबांची परमभक्त होती, तिची आई सुद्धा, म्हणजे माझी आजी, माझ्या आजीने तर साईबाबांना बघितलं होतं. ते नाशिकलाच राहायचे तिकडूनं शिर्डी दोन अडीच तासाच्या अंतरावर, आई नाशिकला माहेरी गेली की त्या शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायच्या, आणि मलाही ती नेहमी शिर्डीला घेऊन जायचीच."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "त्या काळामध्ये शिर्डीच्या प्रसादालाया मध्ये दोन रुपयाला जेवण मिळायचं, लहानपणी तो बाबांचा प्रसाद म्हणून मी तिथे पोटभर जेवायचो,
त्यावेळेला सुद्धा ८०० ते १००० लोकं एका वेळेला जेवायचे, छान गरम गरम चविष्ट जेवण प्रत्येकाला मिळायचं, आजही मी शिर्डीत गेलो की त्या प्रसादलयामध्ये जेवल्याशिवाय मी परत येत नाही, माहेरवाशीन जशी खूप वर्षांनी माहेरी आली, आईच्या हातचं जेवली, की जे समाधान तिला मिळतं, मन भरतं, तसंच मला शिर्डीच्या प्रसादालयामध्ये जेवल्यानंतर माझं मन भरत.आज "आई कुठे काय करते"च्या यशामुळे, मला शिर्डीचं किचन पाहण्याची परवानगी मिळाली , ज्या माऊल्या दहा दहा हजार पोळ्या एका दिवशी लाटतात , त्यांची अशी गप्पा मारायची संधी मला मिळाली, आईच्या आशीर्वादा सारखा त्यांचा आशीर्वाद मला मिळतो."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "आज शिर्डी मध्ये लाखो लोकांना मोफत जेवण दिलं जातं, त्या सगळ्यांची पोटं भरण्याच पुण्य या सगळ्या माउल्या करत असतात आणि ते सुद्धा प्रसन्न मनाने, आनंदाने करत असतात. शिर्डी मध्ये गेलो की एक वेगळी ऊर्जा मिळते, आशा मिळते, आपण सगळे सामान्य माणसं आहोत, या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक वेळेला आपल्याला एका भक्कम आधाराची गरज असते, खूपशा गोष्टी आपल्या क्षमतेच्या पलीकडच्या असतात, खूपशा गोष्टी आपल्याला अशक्य वाटत असतं, अशा वेळेला आपल्याला त्या परमेश्वराचा आधार हवा असतो, त्याच्या मदतीची गरज असते."
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "लहानपणापासून आयुष्यामध्ये मला बाबांचा आधार मिळाला आहे, खूप अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बाबांमुळे झाल्या आहेत, त्या कशा झाल्या हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. मी कधीच ठरवून शिर्डीला आलो नाही, तो दर्शनाचा योग आल्याशिवाय माझा शिर्डीमध्ये प्रवेश होत नाही, मला बाबा बोलून घेतात,या वेळेला दिपा, दिग्विजय, मिथिला बरोबर तीन वर्षानंतर हा माझा योग आला." अशाप्रकारे मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्यात.