"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 02:15 PM2024-06-17T14:15:22+5:302024-06-17T14:16:03+5:30

मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे. 

aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father | "मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. मालिकेत तिरसट स्वभाव असलेला अनिरुद्ध त्याच्या मुलांसाठी मात्र कायम छातीची ढाल करुन उभा असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत अनिरुद्ध साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे. 

नुकतंच जागतिक फादर्स डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केल्या. मिलिंद गवळींनीदेखील वडिलांसाठी पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. 

वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

Happy Father’s Day
आपल्या वडिलांविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. खरंतर रोजच आपल्याला आपल्या वडिलांचे आभार मानायला हवेत. रोज त्यांना साष्टांग दंडवत घालायलाच हवा. आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते जर राहून जात असेल, तर मग आजचा दिवस जगभरामध्ये father’s Day म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितृ दिन साजरा केला जातो की नाही माहिती नाही. पण, आजच्या दिवशी आपल्या वडिलांविषयी आपलं प्रेम , आदर व्यक्त करायला काहीच हरकत नाही. 

 

जशा पिढ्या बदलत जातात तसं वडील मुलाचे नातेही बदलत जातात. म्हणजे माझ्या आजोबांची माझ्या पंजोबांसमोर उभे राहायची सुद्धा कधी हिंमत झाली नाही. माझ्या वडिलांचं आणि माझ्या आजोबांचं नातं असं होतं की ते फार एकमेकांशी बोलत नसेत. माझ्या वडिलांना काही निरोप द्यायचा असेल तर आजोबा आजीला सांगायचे. त्यांच्यात पत्रव्यवहार व्हायचा हे मला आठवतंय. आणि माझी आई असेपर्यंत माझ्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्येही फार संवाद नव्हता. पण, नंतर आमचा संवाद सुरू झाला. त्याचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. आज माझ्या वडिलांशी माझी खूप घट्ट मैत्री आहे. माझे वडील माझे जीवस्य कंठश्य मित्र आहेत आणि त्यांच्याशी मी कुठल्याही विषयावर कधीही बोलू शकतो. नातं अगदी खूप जवळच झालं की न बोलता मनातल्या गोष्टी पण एकमेकांना समजायला लागतात. तसंच आमचंही झालं आहे.

बहुतेकांना आपले आदर्श बाहेर शोधावे लागतं. माझ्या बालपणापासूनच माझे आदर्श माझ्या कायम जवळ आहेत “ माझे वडील”. he has always been my hero. माझ्या वडिलांच्या कर्तृत्वातलं मला आयुष्यात दहा टक्के सुद्धा मिळवता आलं तरी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. सतत कामाचा ध्यास घेणं ते सुद्धा इतरांच्या कल्याणासाठी...सतत झटत राहणं हे मला कळायला लागल्यापासून मी त्याच्यांत पाहत आलोय. मुंबई पोलीस या खात्यामध्ये काम करत असताना असंख्य वेगवेगळ्या स्वभावांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी कामं केली आणि सगळ्यांकडूनच उत्तम confidential report remark मिळवला. आजही वयाच्या 85 वर्षामध्ये त्यांच्या एका जवळच्या मित्राच्या कार्यक्रमाला गेले होते. हात fractured झालेला असताना सुद्धा उद्घाटन सोहळा पार पाडूनच मग डॉक्टरांकडे गेले. आपल्यामुळे दुसऱ्याची अडचण व्हायला नको ही मनामध्ये सतत भावना. मी भाग्यवान आहे की मी त्यांचा मुलगा आहे!

मिलिंद गवळींच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांची ही पोस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 
 

Web Title: aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.