Video : 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची चाहत्यांमध्ये हवा, सेल्फीसाठी लागल्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:14 AM2023-03-17T11:14:03+5:302023-03-17T11:15:22+5:30
अनिरुद्ध नुकताच एकविरा आईच्या दर्शनाला गेला होता तिथे चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडाच घातला.
'आई कुठे काय करते' मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय आहे. प्रेक्षकही भरभरुन प्रेम देत आहेत. मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मिलिंद गवळीलाही (Milind Gawli) प्रेक्षक खूप प्रेम देत आहेत. खरं तर मालिकेत त्याची निगेटिव्ह भूमिका आहे मात्र तरी चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ आहे. अनिरुद्ध नुकताच एकविरा आईच्या दर्शनाला गेला होता तिथे चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडाच घातला. हे प्रेम पाहून अभिनेता भारावला.
अभिनेता मिलिंद गवळीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चाहते त्याला बघून खूप खूश झालेत आणि त्याच्यासोबत सेल्फी, फोटो घेण्यासाठी गर्दी झाली आहे. लहान मोठे सर्वच अनिरुद्धला पाहण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. अनिरुद्ध हे प्रेम पाहून भारावून गेला आहे. त्याने या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रेम - आतहा प्रेम - असीम प्रेम
आपली माणसं आपल्यावर प्रेम करतातच,
जन्माला आल्या आल्या सगळ्यांना आपल्यावर प्रेम करायला आई असते,
जिच्या प्रेमाची तुलना होऊ शकत,
त्यामुळे आपण सगळेच जन्माला आल्यापासून आपल्यावर अतोनात प्रेम करणारा एक तरी व्यक्ती असतोच असतो,
ती म्हणजे आपली आई.....
आणि मग वडील असतात, प्रत्येकाला ही दोन माणसं तर असतातच , निस्वार्थ प्रेम करणारी,
मग नातेवाईक आले, आजी आजोबा आले, आपल्या आईचे आई वडील आणि मग वडिलांचे, नातवावर प्रेम करायला,
मग काका काकू मावश्या मामा मामी आल्या, ते पण आपल्यावर प्रेम करतात, मग भावंड आले, सख्खे चुलत मावस, मग कौटुंबिक मित्रमंडळी पण असतात प्रेम करणारे.
जन्माला आल्यापासून कमी जास्त प्रमाणात हे बेसिक लोकं असतात आपल्यावर प्रेम करणारे.
जस जसे आपण मोठे होत जातो, आपल्या स्वभावावर लोकं ठरवतात , याच्यावर आता प्रेम करायचं की नाही ते, म्हणजे बघा
आमच्या कुटुंबात एक लहान मुलगा होता, त्यांच्या घरी कोणीही पाहुणा आला की तो अचानक त्यांच्या मुस्कटात मारायचा, आणि जर त्या पाहुण्यांनी त्याला परत एकदा त्यांच्या मुस्कटात मारून दिलं नाही तर भोकाड पसरायचा,
Naturally आम्हच्या कुटुंबातले फार कमी पाहूणे त्या मुलावर प्रेम करायचे,
पण काही बाळं समंजस होती ,रडायची नाही ,हट्ट करायची नाही ,शांत असायची, ती बाळा बर्याच लोकांची लाडकी असायची,
मी काय घरातल्यांना कोणाला फार त्रास दिला नाही फक्त माझा एकच प्रॉब्लेम होता की दार उघडलं की मी घराच्या बाहेर पळायचो, दिवसभर भटकायचो , आणि कुठल्यातरी मुलाशी मारामारी करून यायचो, त्याची आई माझी तक्रार करायला घरी यायची आणि मग आईच्या हातचा मार खायचो, बरं मी मार पण शांतपणे खायचो,
आरडाओरडा करायचा नाही, पळून जायचं नाही, हँगर सांडशी लाटणं जे आईच्या हातात येईल ते अंगावर झेलायचं आणि गप्प बसायचं, मग आईलाच खूप वाईट वाटायचं, आणि मग पुन्हा माझे लाड व्हायचे,
सगळ्यांनीच माझे खूप खूप लाड केले, पण मी लाडावलो नाही,
पण लाड करून घ्यायची सवय मात्र लागली,
काही बिचारे खूप दुर्दैवी असतात, आयुष्यामध्ये त्यांचे फार कमी लाड होतात किंवा होतच नाहीत.
प्रेमाशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही,
कलाकार पण बहुतेक मी यासाठी झालो असेन.
प्रेमाला ही खरंच नशीब लागतं कारण अनिरुद्ध सारखा toxic डोक्याने सटकलेलं कॅरेक्टर करतोय, तरीसुद्धा लोकांचं मला भरभरून प्रेम मिळत आहे, लोकं अनिरुद्ध चा द्वेष करतात पण मिलिंद गवळी वर प्रेम करतात.
माझ्यासाठी हेच यश आहे, या सगळ्यांच्या प्रेमाने मला समृद्ध केलं.
मिलिंदच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. पर्सनॅलिटीच तशी आहे, खूप छान लिहिता तुम्ही, आम्हाला तर आशुतोषपेक्षा अनिरुद्धचंच कॅरेक्टर जास्त आवडतं अशा कौतुकाच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.