कपाळावर गोल टिकली अन् हातात टोपली; अरुंधती दिसणार नव्या भूमिकेत, मधुराणीने शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:14 PM2024-08-30T13:14:24+5:302024-08-30T13:15:01+5:30
'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची नवी भूमिका, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर घराघरात पोहोचली. या मालिकेने मधुराणीला यशाच्या आणि प्रसिद्धीच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आई कुठे काय करतेमध्ये मधुराणीने साकारलेली आई प्रत्येकालाच आपल्या घरातली वाटते. आता अरुंधती वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मधुराणीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून पोस्टद्वारे चाहत्यांना करिअर आणि लाइफमधील अपडेट्स देत असते. नुकतंच मधुराणीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा लूक बदलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत मधुराणी नवीन लूकसाठी तयार होताना दिसत आहे. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, केसाचा आंबाडा, कपाळावर मोठी गोल टिकली असा लूक मधुराणीने केला आहे. या व्हिडिओला तिने "वेगळं काही करून बघायला नेहमीच मजा येते...", असं कॅप्शन दिलं आहे.
मधुराणीचा हा लूक नवीन प्रोजेक्ट मधील आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. लवकरच मधुराणी नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा प्रोजेक्ट नेमका कोणता आहे, याबाबत अद्याप अभिनेत्रीने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, अरुंधती म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मधुराणीला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीची भूमिका साकारलेल्या मधुराणीने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमात ती झळकली होती. या सिनेमात तिने साकारलेली व्हीजेची भूमिकाही लोकप्रिय ठरली होती. मधुराणी अभिनेत्रीबरोबरच एक उत्तम लेखिकादेखील आहे.