'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं नवीन वर्षात उचललं मोठं पाऊल, होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:57 PM2023-01-02T17:57:45+5:302023-01-02T17:58:21+5:30
Ashwini Mahangade :आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नवीन वर्षात नवीन सुरुवात केलीय.
नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्षात अनेकांनी नवीन रिसोलुशन्स करण्याचं ठरवलं आहे. कलाकारांनीही नवीन वर्षांत काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं. आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने नवीन वर्षात नवीन सुरुवात केलीय. अश्विनी अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपताना दिसते. त्यामुळे नवीन वर्षात अश्विनीने मोठे पाऊल उचलले आहे. तिने महिलांच्या मार्गदर्शनासाठी नवीन संस्था सुरू केली आहे. FLYING ANGEL असं या संस्थेचं नाव असून सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.
अश्विनी महांगडे हिने फोटो शेअर करत लिहिले की, बरेच दिवस १ जानेवारीला नवीन काहीतरी करीत आहोत अशा पोस्ट पाहिल्या असतील. सगळ्यांच्या मनात प्रश्न उभे राहिले की आता हे काय नवीन करतात? मुळात आपल्या माणसांना सोबत घेवून पुढे जाणे याला मी आणि बाबा प्राधान्य देतो. पण जे सोबत आहेत त्यांची कष्ट करण्याची तयारी असायला हवी.
ती पुढे म्हणाली की,रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून गेले ३ वर्ष महाराष्ट्रात काम करताना महिलांसाठी विशेष काम करण्याची संधी मिळाली. अनेक अशा महिला ज्यांच्या अंगी कला आहे पणं त्यांना योग्य माणसं भेटत नाहीत जे त्यांच्या कलेला आणखी वेगळ्या माणसांसमोर घेवून जावू शकतात. म्हणून हा घाट घातला आहे. तुमच्या अंगची कला तुम्हाला पैसे तर कमवून देईल पणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे #नाव आणि ते मिळवून देण्याची जबाबदारी आमची. अशा महिला, मुली ज्यांना काहीतरी करायचे आहे पणं नेमके काय करू याचे मार्गदर्शन मिळत नाही तर या माध्यमातून आम्ही उत्तम मार्गदर्शक तुमच्यासाठी आणत आहोत जे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला मार्ग मोकळा करून देतील. आता आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत आणि तुम्हीही एक पाऊल पुढे या. स्वतःसाठी जगा. आपल्यातील कलेला जगवा.
प्रत्येक पुरूषाने घरातील स्त्री ला तिच्यातील गुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक पुरूषाने तिच्या पाठीशी उभे रहायला हवे. तुमची बहीण म्हणून मी अश्विनी महांगडे आणि भाऊ म्हणून निलेश बाबा जगदाळे कायम उभे आहोत. अट फक्त एक तुमच्या यशात आम्ही आमचे समाधान शोधू पणं तुम्ही मेहनत करायला कमी पडू नका. सविस्तर लवकरचं बोलूयात आज आत्ता फक्त सर्वांच्या अशीर्वादाने Flying Angel चा लोगो सादर करीत आहोत, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले.