खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे..., 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 01:23 PM2022-06-24T13:23:45+5:302022-06-24T13:24:59+5:30
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधती यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ही दोन नावं आज मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहेत. सध्या चर्चा आहे ती अनिरूद्धच्या एका पोस्टची.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधती यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ही दोन नावं आज मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहेत. सध्या चर्चा आहे ती अनिरूद्धच्या एका पोस्टची. म्हणजेच अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांची. मिलिंद गवळी हे नाव तसंही नवं नाही. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. सध्या मिलिंद गवळी यांची एक पोस्ट व्हायरल होते. या पोस्टमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्वप्नांच्या दुनियाच माझं स्वप्न..., असं शीर्षक असलेल्या त्यांच्या या पोस्टनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
मिलिंद गवळी लिहितात...
1975 मध्ये 15 ऑगस्टला ‘शोले’ नावाचा पिक्चर रिलीज झाला . मिनर्व्हा थिएटरमध्ये तुडुंब गर्दी ,त्या काळामध्ये ब्लॅक मध्ये तिकीट विकली जायची. ‘शोले’चे तिकीट मिळवून तो सिनेमा मिनर्व्हामध्येच बघायचा , हे पण माझं स्वप्न होतं , जे काही आठवड्यानंतर माझ्या वडिलांनी पूर्ण केलं. असंख्य सिनेमे बघितले ,सिनेमाशी निगडीत अशी असंख्य स्वप्नंही मी बघितली, (खरंतर अजूनही बघतोच आहे )मी शाळेतच एक स्वप्नं बघितलं होतं ,आपण सिनेमामध्ये काम करायचं. दोन-तीन वर्षात ‘हम बच्चे हिंदुस्तान के’ या चित्रपटात काम केले आणि ते ही स्वप्न पूर्ण झालं, त्यानंतर असंख्य सिनेमांमध्ये मी कामं केली. मग मी स्वप्न बघितलं, आपला स्वत:चा एक सिनेमा असावा,आपण तो बनवावा आणि ‘अथांग’ नावाचा सिनेमा मी केला. त्यामुळे स्वप्न बघावीत, छोटी बघावित, मोठी बघावीत then focus on it and work hard for it, आणि थोडा वेळ द्यावा ,मग ती नक्कीच पूर्ण होतात .
‘अथांग’ सिनेमा बनवत असताना माझ्या घरची मंडळी कधीतरी सेटवर यायची, छान वाटायचं. एक दिवस माझे वडील रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ,मुंबई श्री श्रीराम गवळी साहेब सेटवर आले आणि त्यादिवशी माझे मित्र कन्न आयर (जो डीसीपी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीसचा रोल करत होता) नेमका त्याचाच सीन शूट करत होतो. आमच्या ड्रेसमॅन ने डीसीपीचा युनिफॉर्म आणून दिला ,नेमका माझ्या वडिलांसमोर. पप्पांनी तो पाहायला आणि म्हणाले की हे सगळे बिल्ला /बॅचेस चुकीचे आहेत. डीसीपी चा ड्रेस आहे पण हवालदार चा बॅच / बिल्ला लावलेला आहे. खरंच आम्हाला कोणाला ते लक्षात आलं नव्हतं. खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे हिरो असतो,खरे आपल्या देशातले हिरो म्हणजे माझ्या वडिलांसारखेच असतात...