अरुंधती ढसाढसा रडली, तर अनिरुद्धच्या डोळ्यांतही पाणी! समोर आला 'आई कुठे...' कलाकारांचा भावुक व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:49 PM2024-11-27T14:49:18+5:302024-11-27T14:49:45+5:30
५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ३० डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका. खरं तर या मालिकेच्या प्रोमोनेच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळेच या मालिकेबाबत सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'आई कुठे काय करते' सुरू झाल्यानंतरही अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांना भावली. तर देशमुख कुटुंब आपलंसं वाटलं. म्हणूनच आता मालिका निरोप घेत असताना प्रेक्षकही भावुक झाले आहेत.
'आई कुठे काय करते' मालिकेची टीम 'होऊ दे धिंगाणा'मध्ये हजेरी लावणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कलाकारांसमोर प्रेक्षक त्यांच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहेत. "आम्ही गेली पाच वर्ष 'आई कुठे काय करते'ही मालिका पाहतोय", असं एक प्रेक्षक म्हणताना दिसत आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून अरुंधतीच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तर अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळीदेखील भावुक झाल्याचं दिसत आहे.
"या क्षणासाठी मी काम करत होतो. पण, आज हा क्षण बघायला आई नाहीये", असं मिलिंद गवळी म्हणत आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल कलाकार हात जोडून प्रेक्षकांचे आभार मानत आहेत. कलाकारही भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. मधुराणी प्रभुलकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. तर मिलिंद गवळी अनिरुद्ध आणि रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेत होती. अपूर्वा गोरे, निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ३० डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.