खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:20 IST2025-02-14T13:19:15+5:302025-02-14T13:20:05+5:30

आज मधुराणीने व्हॅलेंटाइन डे निमित्ताने खास कविता सादर केली.

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar Poem On Valentines Day Video Viral | खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ

खुळ्या सोनेरी उन्हासारखं... मधुराणीनं व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर घराघरात पोहोचली. या मालिकेने मधुराणीला यशाच्या आणि प्रसिद्धीच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आई कुठे काय करतेमध्ये मधुराणीने साकारलेली आई प्रत्येकालाच आपल्या घरातली वाटते. 'आई कुठे काय करते' मालिका संपली असली तरी तिची चर्चा मात्र कायम सुरू असते. मधुराणीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून पोस्टद्वारे चाहत्यांना करिअर आणि लाइफमधील अपडेट्स देत असते. नुकतंच मधुराणीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

आज १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपला क्रश, पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तींसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं जातं. या खास दिवशी मधुराणी प्रभुलकरने सुधीर मोघे यांची खास कविता सादर केली आहे. 

वाचा कविता...

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागून कधीच मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश, पाणी, तारे-वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम, स्वप्नं, तळमळ-सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
सारय़ा सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफ़ल-विफ़लतेला
खरतरं काहीच महत्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

  • कवी सुधीर मोघे


मधुराणीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे तिचा हा नवा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, "आवडती आणि तोंडपाठ असलेली कविता". दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की,"फार सुंदर कविता". तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, "प्रेम येत तसं निघूनही जातं, पण कविता खूप सुंदर,तसेच सादरीकरण ही उत्कृष्ट". दरम्यान मधुराणी अभिनेत्रीबरोबरच एक उत्तम लेखिकादेखील आहे. 

Web Title: Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar Poem On Valentines Day Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.