Mother's Day 2022 : कारण प्रत्येक आई..., मिलिंद गवळींनी आईसाठी लिहिली सुंदर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 12:34 PM2022-05-08T12:34:20+5:302022-05-08T12:37:19+5:30
Mother's Day 2022, Milind Gawali : मिलिंद यांची ताजी पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. निमित्त आहे, आजच्या मदर्स डेचं. मदर्स डेच्या निमित्तानं मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधतीला आज कोण ओळखत नाही? मालिका इतकी गाजतेय की, या पात्रांची खरी ओळखही मागे पडावी. ‘आई कुठे काय करते’मध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) अनिरूद्धची भूमिका साकारत आहेत. या मालिकेने मिलिंद घराघरात पोहोचले. मिलिंद अनेक वर्षांपासून टीव्ही, मराठी व हिंदी सिनेइंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावरही ते तितकेच अॅक्टिव्ह आहे. मिलिंद यांची ताजी पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. निमित्त आहे, आजच्या मदर्स डेचं. मदर्स डेच्या निमित्तानं मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद यांनी आईसाठी पोस्ट लिहिली आहे. आज आई या जगात नाही. पण तिच्या आठवणी, तिचे आशीर्वाद सोबत आहेत.
मिलिंद गवळी यांची पोस्ट...
‘21 जून 1946 रोजी माझी आई इतरांची सेवा करण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठी या पृथ्वीवर अतवरली होती. 2 मार्च 2009 या दिवशी ती या ग्रहावरून निघून गेली. तिने आयुष्यभर लोकांना मदत केली. ती आयुष्यभर इतरांसाठी जगली. त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत. ती नेहमी म्हणायची, आपल्याला आयुष्य फक्त एकदाच मिळते, म्हणून त्याचा पूरेपूर फायदा घ्या आणि इतरांबद्दल द्वेष वा वाईट भावना बाळगू नका. नेहमी आनंदी राहा. एकेदिवशी तिने मला एक सुंदर गोष्ट सांगितली होती. ती कथा अशी होती...एके दिवशी एक साधू नदीजवळून जात होता आणि त्याला एक विंचू बुडताना दिसला. त्याने त्याला बाहेर येण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला पण विंचू त्याला चावू लागला. तरीही तो साधू त्याला बाहेर येण्यास मदत करत गेला. एका वाटसरूने हे पाहिलं आणि त्याला विचारलं. साधू, विंचू तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही त्याला मदत करण्याचा प्रयत्न का करत आहात?
साधूने उत्तर दिलं, ‘एवढा लहान प्राणी आपला स्वभाव आणि चावण्याची नैसर्गिक वृत्ती सोडत नाही मग मी इतरांना मदत करण्याचा माझा स्वभाव का सोडू ? तो त्याचे काम करतो आणि मी माझं काम करत आहे.’
हे जीवन आनंदी आणि इतरांसाठी आनंदानं जगण्यासाठी माझ्या आईनं अनेक शिकवणी आणि अतुलनीय आशीर्वादाच्या खूप सुंदर आठवणी सोडल्या. जग आज मदर्स डे साजरा करत आहे.आपण सर्वांनी प्रत्येक दिवशी मातृदिन साजरा करूया. कारण प्रत्येक आई बिनशर्त प्रेमासाठी पात्र आहे.
बालकलाकार म्हणून मिलिंद गवळी यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले होते. अभिनय आणि चित्रपटांची आवड त्यांना लहानपणापासूपच होती. अभिनयक्षेत्रात काही तरी करून दाखवाचं, हे स्वप्न त्यांनी खूप आधीच पाहिलं होतं. अभिनयाची आवड त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन आली. मराठीत त्यांनी आम्ही का तिसरे, शूर आम्ही सरदार, ढोलकीच्या तालावर, वैभवलक्ष्मी, सख्खा भाऊ पक्का वैरी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर, सासूच्या घरात अशा चित्रपटात काम केले आहेत.
मराठीसोबत हिंदीतही त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम करत तिथे आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे.