"कोल्हापूरची माणसं रांगडी असतात पण..."; आई कुठे.. फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:23 PM2024-08-13T12:23:20+5:302024-08-13T12:24:59+5:30
आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी कोल्हापूरमध्ये केलेल्या एका सिनेमाच्या शूटींंगचा किस्सा सांगितला आहे (aai kuthe kay karte)
आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी कोल्हापूरला पालखी सिनेमाचं शूटींग केलं होतं. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. मिलिंद गवळी लिहितात, "दिग्दर्शक विनोद कुमार एक दिवस माझ्याकडे आले एका मराठी चित्रपटाच्या संदर्भात. विनोद कुमार यांनी सहा महिने वर्षभर या "पालखी" नावाच्या कथेवर काम केलं होतं. त्याचवेळेला "कहानी तेरी मेरी" नावाची एक सिरीयल मी करत होतो, त्यात राजा गोसावींच्या कन्या क्षमा देशपांडे होत्या, मी विनोद कुमारांना याविषयी सांगितलं त्यांनी आईच्या भूमिकेसाठी क्षमा देशपांडे यांना विचारलं त्या ", वडिलांच्या भूमिकेसाठी अरुण नलावडे होते, मग सुजन बर्नेट नावाची जर्मन अभिनेत्री, शितल पाठक यांना घेण्यात आलं.
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "सिनेमाचे निर्माते कोणी दिल्लीला राहणारे, त्यांनी दोन व्यक्तींना निर्मितीची जबाबदारी दिली, कोल्हापूरला अतिशय एका सुरेख वाड्यामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झालं, मला कोल्हापुरात चित्रपट करायला खूप आवडायचं, कोल्हापूरची माणसं फार भारी असतात, रांगडी असतात पण मनानं अगदी हळवी असतात, कोल्हापूरचे जेवण उत्कृष्टच असतं, ज्या ज्या अभिनेते व अभिनेत्रींनी कोल्हापूरमध्ये जास्ती चित्रपट केले होते, त्यांची पाच पाच दहा किलो वजन वाढली होती ,असा इतिहास आहे, कोल्हापूर फार निसर्गरम्य आहे, त्यात पन्हाळा, ज्योतिबा. विनोद कुमार यांनी अतिशय छान पद्धतीने या चित्रपटाचे चित्रीकरण केलं, गाण्यांसाठी नरेंद्र पंडित मुंबईवरून आले, मग अचानक दिल्लीचा जो निर्माता आहे त्याचं आणि त्यांनी जे दोन त्याचे सहकारी या चित्रपटासाठी नेमले होते त्यांच्यामध्ये काहीसा वाद झाला असं ऐकण्यात आलं, आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो चित्रपट तसाच डब्यामध्ये पडून राहिला.
मिलिंद गवळी शेवटी एक खास आठवण सांगतात की, "अनेक वर्ष मी आणि विनोद कुमार हा चित्रपट पूर्ण करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहीलो, पण तो निर्मात्यांमधला वाद काही मिटेना, मग आम्ही आशा सोडून दिली, या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा एक किस्सा आहे, त्यात किशोर नांदलस्कर हे कलाकार होते , ते अचानक शूटिंग मधून गायब झाले आम्ही त्यांची शोधा शोध केली तर एक दीड तासानंतर ते रिक्षातून परत सेटवर आले, मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे गेला होतात, आम्ही तुमची खूप शोधाशोध केली, तर ते मला म्हणाले की मी डायबिटीक आहे आणि माझी शुगर पाचशे साडेपाचशे च्या वरती गेली होती, मला डॉक्टर कडे जाणं भाग होतं, मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं आमच्यापैकी कोणीतरी गाडी घेऊन तुम्हाला घेऊन गेलो असतो? तर ते म्हणाले मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता, सज्जन कलाकार, त्यांच्या 15 दिवसाच्या शूटिंग चे पैसेही त्यांना मिळाले नाहीत. एक सिनेमा बंद पडतो त्यात निर्माता दिग्दर्शक याचं तर नुकसान होतच पण त्याचबरोबर 40 कुटुंबाचे हे नुकसान होते."