'४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:26 PM2024-09-16T14:26:11+5:302024-09-16T14:28:22+5:30

मिलिंद गवळींनी एका सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारतानाचा खास अनुभव मिलिंद गवळींनी सांगितलाय (milind gawali)

aai kuthe kay karte fame Milind Gawli played the role of transgender person in movie aamhi ka tisre | '४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

'४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर त्यांच्या विविध सिनेमांबद्दल लोकांना माहिती देत असतात. अशातच मिलिंद गवळींनी त्यांच्या एका विशेष सिनेमाबद्दल प्रेक्षकांना सांगितलंय. हा सिनेमा म्हणजे आम्ही का तिसरे. या सिनेमात मिलिंद यांनी तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे खास व्हिडीओ पोस्ट करुन मिलिंद गवळी लिहितात, "आम्ही का तिसरे" राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अलकाताई कुबल निर्माती,
आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी याच्या जीवनावर आधारित माझी भूमिका, अंगावर शहारा येईल असं कथानक, प्रत्यक्ष त्या वस्त्यांमध्ये शूटिंग जिथे जायला कोणालाही भीती वाटेल, तृतीयपंथी किंवा हिजडे यांचं आयुष्य, त्यांचा समाज, त्यांच्या रूढी परंपरा, त्या संपूर्ण जमातीचा संघर्ष, किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याशी माणुसकीची वागणूक."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "माझ्यासारख्या एका कलाकाराला अशी भूमिका मिळणं म्हणजे एक प्रकारचं challenge होतं, मी ही भूमिका करायला नाही म्हणणार पण तरीही आपण मिलिंदला विचारू असं अलकाताईंना सूचण आणि त्यांनी मला या भूमिकेविषयी विचारणं, हे माझं भाग्य आहे.40- 45 दिवस एका वेगळ्या विश्वात जगलो मी, ही माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात पण यांच्या विषयी आपल्याला काहीच माहित नसतं, ती कशी जगतात, जगण्यासाठी काय संघर्ष करत असतात, ती गेल्यानंतर सुद्धा त्यांना पुरण्यासाठी किंवा जाळण्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध नाही आहे, भीक मागणे किंवा शरीर विक्री करणे याच्या पलीकडे त्यांना कोणीही काहीही काम देत नाही,
या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचा सिनेमा करणं म्हणजे खूपच हिम्मतीचं काम आहे, त्यासाठी अलकाताई आणि समीर आठले यांचं खरंच कौतुक आहे, पारू ताई नाईक यांचे पुस्तक "मी का नाही" याच्यावर आधारित हा चित्रपट त्यांनी बनवला, अशा प्रकारचे विषय लोकं बघणार नाहीत थेटरमध्ये कोणीही हिजड्याचा सिनेमा बघायला येणार नाही ही कल्पना असताना सुद्धा आपल्या आयुष्यभराची पुंजी अशा विषयांसाठी लावायची हिम्मत सगळ्यांमध्ये नसते."


मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "आजही कुठल्याही चॅनेलने हा चित्रपट विकत घेतला नाही, मला त्यावर्षी दोन उत्कृष्ट अभिनेता विशेष लक्षवेधी म्हणून पुरस्कार मिळाले, पण खंत एका गोष्टीचा आहे की हा चित्रपट लोकांपर्यंत काही पोहोचला नाही, आत्ताच्या काळामध्ये अगदी विविध आघोरी प्रकारचे सिनेमे ओटीटीवर लोक आवर्जून बघतात, अतिशय घृणा येईल इतका रक्तपात या चित्रपटांमध्ये दाखवला जातो, मग "आम्ही का तिसरे" सारख्या सामाजिक प्रश्नांचा विषय का बरं लोकांपर्यंत येत नाही,
माझ्यासाठी हा सिनेमा करतानाचा अनुभव हा अविस्मरणीय, ४०-५० हिजड्यांबरोबर दीड दोन महिने सलग शूटिंग करत होतो, त्यातल्या काहींचं आयुष्य जाणून घ्यायची संधी मला मिळाली, किती खडतर आयुष्य हे सगळे जगत असतात याचा अनुभव आला,समाज आपल्याला वाळीत टाकतो आपल्याला जवळ करत नाही मग त्यांनी त्यांचा एक वेगळा समाज तयार केला आणि ते अतिशय प्रेम करतात एकमेकांवर, आणि एक कुटुंब तयार करून ते राहतात."

Web Title: aai kuthe kay karte fame Milind Gawli played the role of transgender person in movie aamhi ka tisre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.