लग्नाच्या १० वर्षानंतर मराठी अभिनेत्रीने घेतला आई होण्याचा निर्णय; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 08:50 AM2023-08-21T08:50:17+5:302023-08-21T08:51:06+5:30
Marathi actress: सध्या तिने कलाविश्वातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे
मराठी कलाविश्वातील काही निवडक पण गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे राधा सागर (radha sagar). मध्यंतरी आई कुठे काय करते या मालिकेतून राधा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने कलाविश्वातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. राधा लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच राधाने ई-टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय का घेतला हे सांगितलं.
"सध्या माझ्या गरोदरपणाचा शेवटचा महिना सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या घरी नवा पाहुणा किंवा पाहुणी येण्याची शक्यता आहे. सागरशी लग्न करुन मला १० वर्ष झाली. पण, आम्ही बाळासाठी थांबलो यामागेही काही कारण आहे. मी माझ्या अभिनयाचं करिअर लग्नानंतर सुरु केलं. त्यामुळे लगेच मुलांचा विचार नको असं आम्ही एकमेकांशी बोलून ठरवलं. आधी आम्ही आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. जेव्हा आम्ही करिअरमध्ये सेटल होऊ तेव्हाच मुलांचा विचार करु. त्यामुळे आम्ही थांबलो. मला वाटतं की, गरोदरपणात नवरा आणि त्याच्या कुटुंबियांकडून मिळणारा पाठिंबा खूप गरजेचा आहे", असं राधा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मूल होणं हा निर्णय वैयक्तिक आहे. मी मूल होण्याचा निर्णय घेतला आणि मग करिअरमधून ब्रेक घेतला. मला वाटतं की मूल होणं किंवा न होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आजकाल लोक सरोगसी आणि आयव्हीएफ गर्भधारणेसाठी जातात ही त्यांची निवड आहे. मला सामान्य गर्भधारणा हवी होती आणि मी ती निवडली."
दरम्यान, सध्या राधाने अभिनयातून ब्रेक घेतला असून ती आपल्या आरोग्यावर लक्ष देत आहे. राधाने लोकप्रिय 'आई कुठे काय करते' मालिकेत भूमिका साकारली होती. अभिषेकच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत ती दिसली होती. राधाला अभिनयाव्यतिरिक्त डान्सचीही आवड आहे. तसंच ती संजय लीला भन्साळींच्या 'मलाल' सिनेमातही झळकली आहे.