"मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 10:22 AM2024-11-09T10:22:43+5:302024-11-09T10:23:59+5:30
रुपाली साकारत असलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. संजनाने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे.
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. सलग ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेत आहे. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीबरोबर इतर पात्रांवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले संजनाचं पात्र साकारत आहे. रुपाली साकारत असलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. संजनाने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे.
रुपालीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'आई कुठे काय करते' मालिका आणि संजनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या मुलाखतीत रुपालीला "मालिका संपल्यानंतर जास्त कोणाला मिस करशील?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रुपालीने अनिरुद्धचं नाव घेतलं. ती म्हणाली, "अरुंधतीबरोबर माझा ऑफ कॅमेरा चांगला बॉन्ड आहे. पण, तितके आम्ही रेग्युलर बोलत नाही. कारण, तिचे जेव्हा केळकर घरात सीन असायचे तेव्हा ती तिथे असायची. आमचे जास्त वादविवादाचे सीन असतात. त्यामुळे आम्ही असं बसून छान गप्पा मारलेल्या नाहीत. या सेटवरच्या एका व्यक्तीला मिस करायचं म्हटलं तर ते म्हणजे मिलिंद सर...म्हणजे अनिरुद्ध देशमुख".
"कारण, त्यांच्याशी जितक्या गप्पा झाल्यात...मानसिक, भावनिक, प्रोफोशनल विचारांची देवाणघेवाण झालीये...त्यांच्याबरोबर मी खूप गोष्टी शेअर केल्या आहेत. गौरीनंतर जर या सेटवर कोणी असेल तर ते मिलिंद सर. मला वाटतं मी त्यांना जास्त मिस करेन", असंही रुपाली पुढे म्हणाली.
'आई कुठे काय करते' मालिकेत संजना ही भूमिका सुरुवातीला अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. मात्र काही कारणांमुळे दिपालीने ही मालिका सोडली. त्यानंतर मालिकेत रुपाली भोसलेची एन्ट्री झाली. रुपालीने साकारलेली संजनाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.