‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमचा स्तुत्य उपक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:16 PM2021-01-20T12:16:50+5:302021-01-20T12:21:34+5:30
‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच २५० भागांचा टप्पा गाठणं शक्य झालं. यापुढेही मालिकेला असाच प्रतिसाद मिळत राहिल ही आशा आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे.या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेचे २५० भाग नुकतेच पूर्ण झाले.
यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करायचं ठरवलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींनी पुण्याजवळच्या ‘आपलं घर’ या संस्थेला भेट दिली. विशेष गोष्ट म्हणजे मालिकेच्या संपूर्ण टीमने आपलं एक दिवसाचं मानधन या संस्थेला भेट म्हणून दिलं.
'आई कुठे काय करते' मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाविषयी सांगताना दिग्दर्शक रवींद्र करमरकर म्हणाले, ‘आपलं घर ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुलं आणि वृद्धांचं संगोपन करत आहे. अनेक कलाकारदेखिल या संस्थेशी जोडले गेले आहेत. याबद्दल मला माहिती होती. त्यामुळेच आई कुठे काय करतेच्या २५० भागांचं सेलिब्रेशन आम्ही आपलं घर मधील या खास परिवारासोबत करायचं ठरवलं.
आमच्या संपूर्ण टीमने अख्खा दिवस या परिवारासोबत घालवला. केक कटिंग आणि धमाल करत आम्ही हा दिवस संस्मरणीय केला. या कल्पनेला सर्वांनीच होकार दिल्यामुळे हे शक्य झालं.’‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच २५० भागांचा टप्पा गाठणं शक्य झालं. यापुढेही मालिकेला असाच प्रतिसाद मिळत राहिल ही आशा आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिकामालिका अरुंधती देशमुखच्या अवतीभोवती फिरते. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.