चार महिने शूटींग केले, दमडीही दिली नाही...! अलका कुबल यांच्या आरोपांना प्राजक्ता गायकवाडने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 03:49 PM2020-11-04T15:49:29+5:302020-11-04T16:23:54+5:30
‘आई माझी काळूबाई’ मालिकेचा वाद, बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर
‘आई माझी काळूबाई’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. पण तूर्तास या मालिकेच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. प्राजक्ता सेटवर उशीरा येते, ना ना नखरे करते, असा आरोप अलका कुबल यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता प्राजक्ताने उत्तर दिले आहे. अलका कुबल यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र दीड महिन्यांपूर्वी सहकलाकाराने मला शिवीगाळ केल्यानंतर निर्मात्या या नात्याने त्यांनी कोणतीही ठोस व योग्य भूमिका घेतली नाही. त्यावेळी त्यांनी योग्य ती भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असे प्राजक्ता म्हणाली. यावेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
काय म्हणाली प्राजक्ता गायकवाड?
अलका ताई वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता व आजही आहे. मालिकेतून मला काढण्यात आले नसून मी स्वत: मालिका सोडली. सहकलाकारासोबत झालेला वाद, त्याने मला केलेली शिवीगाळ या प्रकरणामुळे मी मालिका सोडली. सहकलाकाराने मला शिवीगाळ केल्यानंतर अलका ताईनी माझ्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित होते. योग्य भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र केवळ मालिका सुरु ठेवायची म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. मला सगळे काही असह्य झाले तेव्हा मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. शिवीगाळ करणा-या सहकलाकाराने एका शब्दानेही माझी माफी मागितली नाही. त्याने मला आईबहिणीवरून शिव्या दिल्या, मात्र अलका ताई शांत राहिल्या. बघू, एवढेच त्या म्हणाल्या. केवळ मालिका सुरु राहण्यासाठी अशा लोकांना तुम्ही अभय देत असाल तर मी काम करू शकत नाही, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले.
यापूर्वी ‘मी स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत दोन वर्षे काम केले. त्याआधी ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत काम केले. माझे नखरे असते तर या मालिकेच्या निर्मात्यांनी मला सहन केले नसते. या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केली नाही. पण आता हे आरोप होत आहेत. माझ्या मते, हा फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे प्राजक्ता म्हणाली. चार महिने मी या मालिकेसाठी शूटिंग केले. पण अद्याप एक रुपया मला देण्यात आला नाही. तरीही मी काम सुरु ठेवले. इतके करूनही माझ्यावर आरोप होत आहेत, हे बघून वाईट वाटतेय, असे ती म्हणाली. यावेळी तिला अश्रू अनावर झालेत.
काय आहेत अलका कुबल यांचे आरोप
परीक्षा असल्यामुळे चित्रीकरण करू शकत नाही, असे एक कारण प्राजक्ता सतत द्यायची. पण, सध्या कोरोना काळात सतत कोणत्या परीक्षा सुरु होत्या, असा प्रश्न कोणालाही पडेल. ती सतत सुट्टी मागायची. सेटवर अनेकदा उशीरा यायची. चित्रीकरणासाठी अनेक सीनिअर कलाकार तासनतास तिची वाट बघायचे. तिच्या उशीरा येण्याने अनेकदा चित्रीकरणाला उशीर झालाय. स्क्रिप्ट 15 दिवस आधी हवी, चित्रीकरणासाठी इतकेच दिवस येईल, अशा काय काय तिच्या अटी होत्या. तिची आई नको इतका हस्तक्षेप करायची. निर्माती म्हणून याचा प्रचंड मनस्ताप आम्ही सहन केला. सरतेशेवटी तिच्या जागी वीणा जगतापची मुख्य भूमिकेसाठी निवड केली, असे अलका कुबल यांनी सांगितले होते.