आई तुळजाभवानी अवतारात होणार शिव-शक्तीचे पुनर्मिलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:18 IST2025-02-28T18:18:09+5:302025-02-28T18:18:49+5:30
Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत देवींच्या वैयक्तिक आयुष्यातला गोड टप्पा उलगडतो आहे.

आई तुळजाभवानी अवतारात होणार शिव-शक्तीचे पुनर्मिलन
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी (Aai Tulja Bhavani Serial ) मालिकेत देवींच्या वैयक्तिक आयुष्यातला गोड टप्पा उलगडतो आहे.आई तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांचा यमुनांचल पर्वतरांगामधल्या वाड्यातला दैवी सहनिवास सुरू होतो आहे. मोठ्या विरहानंतर शिव- शक्तीच्या पुनर्मिलनाचा अविस्मरणीय क्षण हा येत्या काही भागातले विशेष आकर्षण असणार आहे.
महाशिवरात्रीला कैलासावर पंचानन महादेवांचे अलौकिक रूप दर्शन झाल्यावर सर्व देवदेवता, भवानीशंकर अवतरातील महादेव, तुळजाभवानी अवतरातील देवी पार्वती यमुनांचल पर्वत रांगांमध्ये परतल्या असून देवींच्या वाड्याच्या प्रवेशाची घटिका जवळ आली आहे. कल्लोळतीर्थ,गायमुख तीर्थ यांच्या निर्मितीने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या वाड्यात गणेशपुजन आणि वास्तुपूजनाचा देखणा दिमाखदार सोहळा रंगणार आहे, या सोहळ्याला मेहुण म्हणून प्रत्यक्ष विष्णुदेव आणि लक्ष्मी उपस्थित आहेत.
देवी लक्ष्मीच्या आग्रहावरुन आई तुळजाभवानीने घेतलेला उखाणा आणि महादेवांची त्यावर प्रतिक्रिया हा आवर्जून पाहण्यासारखा रंजक भाग ही आजपासून येत्या काही भागात उलगडणार आहे. देवी पार्वतीचा आई तुळजाभवानीरूपातले हे अत्यंत आनंदी, आल्हाददायक प्रसन्न रूप देवी भक्तांसाठी आवर्जून अनुभवावे असे आहे.