छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री अनेक वर्षांनंतर करतेय कमबॅक, दिसणार कोमोलिकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:14 PM2019-09-26T13:14:24+5:302019-09-26T13:15:25+5:30
कसौटी जिंदगी की या मालिकेत आता कोमोलिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना कोण दिसणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेतील कोमोलिकाच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू होता. आता कोमोलिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना कोण दिसणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
या मालिकेची निर्माती एकता कपूरने काल केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे नव्या कोमोलिकाच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे. हे ‘ट्वीट’ असे होते, “न्यू कोमो!” यानंतर सध्याची कोमोलिका असलेल्या हिना खानने या ट्विटवर रिप्लाय करत एकताला शुभेच्छा देखील दिल्या. या चर्चेवर उत्तर देताना एकताने नव्या कोमोलिकासाठी नव्या अभिनेत्रीची निवड झाल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर ही अभिनेत्री कोण असेल, याचा सूचक उल्लेखही केला. ती म्हणाली, “हो, आम्ही नव्या कोमोलिकाची निवड केली असून ती अभिनेत्री खूप लोकप्रिय आहे आणि तिने माझ्या एका मालिकेत नायिकेची भूमिकाही साकारली होती.”
Will miss uuuu komo @eyehinakhan uve been awwwwwwsome ..will do something BIG SOOON. ab komo Kaun??????😎🤫🤫🤫🤫 #komolika#KasautiiZiindagiiKay@StarPluspic.twitter.com/FRf5EBzvn9
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) September 25, 2019
या अभिनेत्रीचे नाव आमना शरीफ असून 2003-07 या काळात प्रसारित झालेल्या ‘कहीं तो होगा’ या मालिकेत आमनाने कशीश ही भूमिका साकारली होती. त्यानंतर 2013 मधील ‘एक थी नायिका’ या मालिकेत ती अखेरची टीव्हीवर दिसली होती. यानंतर तिने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटात रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता ती टीव्हीवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
आपल्या कमबॅकविषयी तसेच टीव्हीवर पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारण्याविषयी आमना सांगते, “टीव्हीपासून मी काही काळ दूर राहिले कारण मला माझ्या वैयक्तिक जीवनाची घडी नव्याने बसवायची होती. मला नेहमीच्या भूमिका साकारून आणि प्रेमकथांमध्ये भूमिका रंगवून टीव्हीवर कायम राहता आलं असतं, पण त्यामुळे माझ्यातील अभिनेत्रीचं समाधान झालं नसतं. तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही नवनव्या आणि वेगळ्या भूमिका साकारून आश्चर्याचे धक्के दिले पाहिजेत. म्हणूनच मला जेव्हा कोमोलिकाची भूमिका ऑफर करण्यात आली, तेव्हा मला त्याक्षणी जाणवलं की, ही भूमिकाच माझ्यातील अभिनेत्रीला सर्वात मोठं आव्हान देणारी असेल.”