Exclusive: मालिकांचं शूट १२-१३ तासांचं; मराठी अभिनेता म्हणाला, "हे अमानवी होऊ नये..."
By ऋचा वझे | Published: August 30, 2024 01:31 PM2024-08-30T13:31:18+5:302024-08-30T13:32:07+5:30
अभिनेता सध्या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
टेलिव्हिजनवरील मालिकांचं शूट तासन् तास सुरु असतं. कलाकारांना आणि संपूर्ण युनिटचं मालिकांचं सेट हे दुसरं कुटुंबच असल्यासारखं असतं. मराठी अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) सध्या 'सुख कळले' मालिकेत दिसत आहे. त्याची आणि स्पृहाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आशयने त्याच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनमधूनच केली. 'माझा होशील ना' मध्ये त्याने भूमिका साकारली होती. मालिकांचं शूट म्हणलं की १२-१३ तास वेळ द्यावा लागतो. त्यात प्रवासाचा वेळ वेगळाच. याविषयी नुकतंच आशय 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना व्यक्त झाला.
मालिकांचं शूट हे १२-१३ तास असलं तरी तेवढा वेळ त्यासाठी द्यावाच लागतो. त्यामुळे या १२-१३ तासांमध्ये काय केलं पाहिजे यावर 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना आशय म्हणाला, "मालिकेत काम करताना कॉर्पोरेट कल्चर प्रमाणे ८ तास काम आणि शनिवार-रविवार सुट्टी हे शक्य नसतं. पण जर आम्ही १२-१३ तास काम करतोय तर ते अमानवी होऊ नये म्हणून काय करू शकतो यावर विचार केला पाहिजे. जसं ब्रेक थोडा जास्त वेळाचा करता येईल का हे बघितलं पाहिजे. एपिसोड्सची बँक करून ठेवली तर संपूर्ण युनिटला थोडा आराम मिळू शकतो. काम १३ तास जरी असले तरी ते कशा पद्धतीने चांगले करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे."
आशयने काही दिवसांपूर्वी एका मालिकेतून एक्झिट घेतली. मालिकेतील काम संपल्यावरही त्याला त्याचं मानधन मिळालं नव्हतं. यामुळे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. लगेच दुसऱ्या दिवशी त्याला त्याचे पैसे मिळाले. कलाकारांना अनेकदा मानधनासाठी पाठपुरावा करावा लागतो. यावरुन आतापर्यंत अनेक कलाकरांनी आवाज उठवला आहे.