हो, मला हा आजार आहे, आता लाज वाटत नाही; अभिनव शुक्लाने अर्ध्यारात्री केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 01:52 PM2021-08-09T13:52:48+5:302021-08-09T13:55:48+5:30
Abhinav Shukla : होय, या पोस्टमध्ये अभिनवने असा काही खुलासा केला की, चाहते हैराण झालेत.
छोट्या पडद्यावरील अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) ‘बिग बॉस 14’मुळे (Bigg Boss 14) चांगलाच चर्चेत आला. बिग बॉससारख्या शोमध्ये त्याची प्रगल्भता पाहून चाहते खूश्श झालेत. आता अभिनव ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त रविवारी अर्ध्या रात्री केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. होय, या पोस्टमध्ये अभिनवने असा काही खुलासा केला की, चाहते हैराण झालेत. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आजारपणाबद्दल सांगितले.
20 वर्षांपासून अभिनव ‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ (Borderline Dyslexic) या आजाराने ग्रस्त आहे. 20 वर्षे ही गोष्ट जगापासून लपवण्याचा खटाटोप त्याने केला. पण आता मात्र होय, मी ‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ या आजाराने पीडित असल्याचे त्याने जगजाहिर केले.
I am a borderline dyslexic, it is public now! So i will divulge more…its nobody’s fault, not even mine, it is what it is! It took me 2 decades to accept this fact! Now numbers and figures dont embarrass me! I am exceptional in spatial ability. I am differently abled!
— Abhinav Shukla (@ashukla09) August 8, 2021
‘मला बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक हा आजार आहे. आता हे सगळ्यांनाच कळालेच आहे. त्यामुळे मी आता यावर मोकळेपणाने बोलणार आहे. यात माझी वा अन्य कुणाचीही चूक नाही. पण तरीही हा आजार स्वीकारायला दोन दशकांचा काळ गेला. आता मला अंक वा आकड्यांमुळे लाजण्याची गरज नाही. मी या आजाराने पीडित आहे, हे सांगण्याची आता लाज वाटत नाही,’ असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अभिनवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात तो लिहितो, ‘होय आकडे, अक्षरं आणि शब्दांमध्ये माझा गोंधळ होतो. मला तारीख, नाव शिवाय एखाद्या तारखेशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवण्यास कठीण जाते. मात्र काही गोष्टींमध्ये मी परफेक्ट आहे. मला अनेक गोष्टी माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवायला सांगा. मी ते सर्व योग्यरित्या करू शकतो. मी काही गोष्टींमध्ये उत्तम आहे तर काहींमध्ये वाईट. या गोष्टी सुधारण्याचा मी सतत प्रयत्न करतोय.’
‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ काय आहे?
‘बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक’ हा आजार असलेल्या व्यक्तिला अंक अणि अक्षरं समजण्यास अडचणी येतात. काही वर्षांपूर्वी आलेला ‘तारे जमी पें’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. तो याच आजारावर आधारित होता. या सिनेमात दर्शिल सफारीला हाच आजार असल्याचे दाखवण्यात आले होते. अगदी कमी वयातच या आजाराची लक्षणं दिसू लागतात.