'पुकार - दिल से दिल तक' मालिकेत अभिषेक निगम झळकणार मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 07:35 PM2024-05-09T19:35:12+5:302024-05-09T19:35:34+5:30
Pukar - Dil Se Dil Tak Serial : 'पुकार – दिल से दिल तक' या आगामी मालिकेच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक गोष्ट आहे, जिची पार्श्वभूमी जयपूर शहराची आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ (Pukar - Dil Se Dil Tak Serial) या आगामी मालिकेच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक गोष्ट आहे, जिची पार्श्वभूमी जयपूर शहराची आहे. आई आणि तिच्या दोन मुलींची ही गोष्ट आहे, ज्यांना एका दुष्ट योजनेने एकमेकींपासून दूर करण्यात आले आहे. पण, नशीब सरस्वती, वेदिका आणि कोयल या तिघींना नकळत, अनपेक्षित परिस्थितीत पुन्हा एकत्र घेऊन येते. त्यांच्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या शक्तीविरुद्ध त्या तिघींना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे.
या मालिकेत अभिषेक निगम (Abhishek Nigam) सागर माहेश्वरी या नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सागर हा प्रसिद्ध माहेश्वरी कुटुंबाचा वारस आहे. व्यवसायाने वकील असलेला सागर अत्यंत हुशार आहे पण त्याच्या तुटक स्वभावामुळे जगाकडे बघण्याची त्याची दृष्टी देखील दूषित होते. त्याला नितीमत्तेचे चाड आहे आणि महिलांचा तो आदर करतो, पण भावनिक दृष्ट्या तो रुक्ष असल्याने प्रेम वगैरे भावनिक गोष्टी त्याला पटत नाहीत. त्याच्या वडिलांशी त्याचे नाते तणावपूर्ण आहे. त्यामुळे, आपल्या वडीलांपेक्षा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणे हीच त्याची महत्त्वाकांक्षा आहे.
या भूमिकेबद्दल अभिषेक निगम म्हणतो, पुकार – दिल से दिल तक एक वेधक कहाणी आहे. या मालिकेत काम करताना मला खूप आनंद होत आहे. सागर ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी थोडे आव्हानात्मक असणार आहे, कारण त्याच्या स्वभावाला अनेक कंगोरे आहेत आणि त्याच्या मनातील भीती आणि प्रेरणा यामुळे व्यक्तिरेखा गडद बनते. तो एक अत्यंत बुद्धिमान आणि आत्मविश्वासाने भरलेला तरुण आहे, ज्याचा प्रेमावर विश्वास नाही, पण त्याचा स्वतःच्याच भावनांशी आंतरिक झगडा आणि संघर्ष सुरू असतो. याचे कारण त्याच्या भूतकाळात दडले आहे. स्वतःचे दुःख लपवण्यासाठी त्याने उपहासाचा आणि आपण श्रेष्ठ असल्याचा मुखवटा धारण केला आहे. पण त्या मुखवट्याच्या खाली त्याची एक दुखरी बाजू आहे, जी पुढे त्याची वेदिकाशी भेट झाल्यानंतर उघड होऊ लागते. आपल्या कुटुंबाच्या वारशातून त्याला मुक्त व्हायचे आहे, तर दुसरीकडे प्रेम आणि जीवनाविषयीच्या स्वतःच्याच मतांशी तो झुंजत आहे. अशाप्रकारे, नानाविध भावना जिवंत करणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. माझ्यासाठी हा भावनांच्या चढ-उतारांचा रोचक प्रवास असणार आहे.