६ वर्षांनी 'बिग बॉस' फेम अभिनेत्याची मराठी मालिकेत एन्ट्री, 'अबोली'मध्ये साकारणार खास भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:31 PM2024-06-08T13:31:56+5:302024-06-08T13:32:51+5:30
स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हा अभिनेता बिग बॉस मराठीमध्ये झळकला होता (aboli)
स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिका प्रेक्षकांच्या आवडीची. या मालिकेला स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत वरचढ असते. सचित पाटील आणि गौरी कुलकर्णी या दोन कलाकारांची मालिकेत प्रमुख भूमिका आहे. हटके कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या आवडीची आहे. आता या मालिकेत एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. तब्बल ६ वर्षांनी हा अभिनेता मालिकाविश्वात कमबॅक करतोय.
६ वर्षांनी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री
स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय. नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे. सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली आणि अंकुश कसा सामना करणार हे पाहाणं उत्सुकतेचं असेल.
अबोली - अंकुशसमोर आव्हान
सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके जवळपास ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. याआधी 'देवयानी' आणि 'गोठ' या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्रेयस सुमन मराठे ही व्यक्तिरेखा देखील हटके असेल. श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे नावासोबतच तो आईचही नाव लावतो. अतिशय हुशार, यशस्वी आणि हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारा श्रेयस अबोली-अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवणार हे पहायचं असेल तर 'अबोली' मालिका रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर बघा .