‘मेरे साई’ या मालिकेमध्ये चंदन मोहन साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 07:15 AM2019-03-22T07:15:00+5:302019-03-22T07:15:01+5:30
मेरे साई या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आता चंदन मोहनचा प्रवेश होणार आहे.
मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. अबीर सुफी या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आता एका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे.
चंदन मोहन ‘मेरे साई’ मालिकेमध्ये काम करण्यास सज्ज झाला आहे. तो पेशाने शिक्षक असलेल्या, श्रीकांत नावाच्या पात्राची भूमिका साकारणार आहे, जो शिर्डीच्या शाळेत शिकवण्यासाठी येतो. कुलकर्णींची बहीण चिऊ ताई एक विधवा आहे आणि त्यामुळे तिला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. श्रीकांत एक सुविद्य माणूस आहे, ज्याला तिच्या कष्टांची जाणीव आहे. त्याचे तिच्याबरोबर खास बंध जुळतील आणि तो तिला आव्हाने पेलायला मदत करेल. ‘मेरे साई’ या मालिकेत समाजातील अशा महत्वाच्या समस्यांना तोंड फोडलेले आहे. या भागात असे दाखवले जाणार आहे की, कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये बंध जुळू शकतात आणि निषेधाचा सूर असला तरी, साई बाबा एक कुटुंब उभं करायला कशी मदत करतात.
‘मेरे साई’ मध्ये श्रीकांतची भूमिका साकारणारा चंदन मोहन सांगतो, “मी श्रीकांतची भूमिका साकारत आहे, जो शिर्डीला एक शिक्षक म्हणून येतो. कुलकर्णींच्या विधवा बहीणीशी, चिऊ ताईशी लोक ज्या पद्धतीने वागतात ते त्याला आवडत नाही. पण माझ्यात आणि चिऊ ताई मध्ये विशेष बंध जुळून आल्याचे दिसेल आणि सामाजिक दबावावर मात करण्यास मी तिला मदत करेन. मी आणि माझा परिवार वास्तविक जीवनात साई बाबांचे अनुयायी आहोत आणि जेव्हा साई बाबा मधील या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मी लगेच भूमिका स्वीकारली. ‘मेरे साई’बद्दल चांगली बाब म्हणजे ही मालिका खूप वास्तविक आहे आणि वेशभूषा, भाषेच्या बाबतीत कुठेही तडजोड केलेली नाही.”
‘मेरे साई’ ही मालिका प्रेक्षकांना दर सोमवार ते शुक्रवार रात्री सात वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळते.