‘दादी’ची भूमिका साकारण्यासाठी अली असगरने कपिल शर्माला दिला होता नकार, अलीने उघड केले 'हे' गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 02:35 PM2019-03-05T14:35:26+5:302019-03-05T14:39:14+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’मध्ये दादी ही गाजलेली भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अली असगर याने नकार दिला होता.
कोणत्याही भूमिकेला रसिकच हिट करतात किंवा फ्लॉप करतात. कलाकाराला स्वतःच त्याची क्षमता ओळखणं गरजेचं असतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’मध्ये दादी ही गाजलेली भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अली असगर याने नकार दिला होता. खुद्द अलीने याबाबतचा खुलासा केला आहे. चंदीगढमध्ये आयोजित जसपाल भट्टी ह्यूमर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अली आला होता. दादी ही भूमिका साकारण्यासाठी नकार दिल्यानंतर कपिल शर्माने अलीला फक्त दोन शो करु, नंतर बघू असं सांगितलं. मात्र दोन शोनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली.
अलीलाही विश्वास नव्हता की ही दादी रसिकांच्या मनात घर करुन जाईल. कोणत्याही भूमिकेचं भविष्य रसिकच ठरवतात. ही भूमिका हिट होणं, फ्लॉप होणं सर्वस्वी रसिकांच्या हातातच असतं असं अलीने सांगितले. मात्र कलाकाराला एखाद्या शोमधील भूमिकेसाठी स्वतःच्या मर्यादा ठरवून घ्याव्या लागतात असंही त्याने स्पष्ट केलं.
दिवसाच्या अखेरीस आपण काहीतरी हटके आणि वेगळे केल्याचं समाधान कलाकाराला मिळणं गरजेचं असतं असंही अलीला वाटतं. यावेळी अलीने शोच्या बिझी शेड्युलचाही उल्लेख केला. बिझी शेड्युअलमुळे आठवड्यातून फक्त दोनदा घरी जायला मिळायचं असंही अलीने सांगितले.
'उल्टा-पुल्टा' या गाजलेल्या कॉमेडी शोचे दिवंगत अभिनेते जसपाल भट्टी यांच्या आठवणींनाही अलीने उजाळा दिला. दगडात फूल उगवण्यासाठी आणि दुःखाला हास्यामध्ये बदलण्यासाठी तुमचा जन्म झाला होता असे गौरवोद्गार अलीने जसपाल भट्टी यांच्याबाबत काढले. जसपाल भट्टी यांच्यासोबत टागोर थिएटरमधील दिवसांच्या आठवणींनाही त्याने उजाळा दिला. रसिकांशी जसपाल भट्टी यांची अशी काही नाळ जोडली गेली होती की टागोर थिएटरमध्ये हास्याचे फवारे उडायचे असंही अलीने नमूद केलं.