अभिनेता गोविंदाला 'ह्या' व्यक्तीने शिकवले स्क्रीनवर रोमांस करायला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:19 PM2018-09-26T20:19:10+5:302018-09-29T06:00:00+5:30
'इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ' कार्यक्रमात अभिनेता गोविंदाने 'फ्रायडे' चित्रपटाचे प्रमोशन केले.
झी टीव्हीवरील 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ' हा कार्यक्रम उपांत्य फेरीत पोहचला असून टॉप सहा स्पर्धक आपल्या अप्रतिम नाट्याविष्काराने प्रेक्षक व परीक्षकांवर आपली छाप टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या 30 सप्टेंबरच्या भागात एव्हरग्रीन अभिनेता गोविंदा आणि वरुण शर्मा हे सेलिब्रिटी अतिथी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आपल्या 'फ्रायडे' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोन्ही कलाकार इंडियाज बेस्ट ड्रामेबाझच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ते या स्पर्धक मुलांचा अभिनय पाहून भारावून गेले आणि त्यांनी या मुलांना आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील काही किस्से ऐकविले.
यावेळी अनिशने सादर केलेल्या एका विनोदी प्रसंगात तो महिला रुग्ण बनला होता; तर हर्षराज लकीने वॉर्डबॉयची भूमिका रंगविली होती. त्यानंतर अँजेलिकाने गोविंदाला विचारले की त्याला कधी एखाद्या प्रसंगासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते का? यावर गोविंदा काहीसा लाजला आणि त्याने सांगितले, 'मला रोमँटिक प्रसंग नीट रंगविता येत नव्हते. 'इल्झाम' हा माझा पहिला चित्रपट. त्यात एका नृत्याच्या प्रसंगात मला धावत जाऊन माझी नायिका नीलमला मिठी मारायची होती. पण मला काही ती गोष्ट जमत नव्हती. त्या कल्पनेनेच मी थरथरायला लागलो आणि मला ताप येईल की काय, असे वाटू लागले. आमची नृत्यदिग्दर्शिका सरोज खानच्या ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा तिने मला विचारले की माझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? त्यावर मी लाजत नाही असे म्हटले. तेव्हा ती म्हणाली की' काही प्रॉब्लेम नाही, पडद्यावर रोमांस कसा करतात, ते मी तुला शिकवीन.'
या वीकेण्डच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे, कारण त्यात अनेक उत्कृष्ट नाट्यप्रवेश सादर केले जाणार आहेत. विष्णू आणि शिवशंकर यांच्यावर एक नाट्यप्रवेश सादर करून आर.एस. श्रीशा आणि सोहम यांनी परीक्षकांची वाहवा मिळविली; तर अँजेलिका आणि हर्षराज लकी यांनी प्रेमळ गायक आणि महिला पोलीस निरीक्षक यांच्यातील विनोदी प्रसंग सादर करून सर्वांना जोरात हसविले. यानंतर गोविंदा आणि वरूण शर्मा यांनी या लहान ड्रामेबाझ मुलांबरोबर भरपूर गप्पा मारून धमाल केली.