गुरमीत चौधरीचा दानशूरपणा! गोरगरीबांच्या मुलांसाठी दिला मदतीचा हात; शिक्षणाचं स्वप्न करणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:27 PM2024-10-25T12:27:43+5:302024-10-25T12:31:21+5:30
लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी ( Gurmeet Choudhary) त्याच्या कृतीने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
Gurmeet Choudhary: लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी ( Gurmeet Choudhary) त्याच्या कृतीने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आजही त्याला टीव्हीवरचा राम म्हणूनच लोक ओळखतात. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमधून धाटणीच्या भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवंल. नुकतीच गुरमीतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलंय.
शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या कष्टकरी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याने मदतीचा हात पुढे केला आहे.सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे अभिनेत्याने काही गरीब मुलींच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये गुरमीतने लिहलंय, "या मुलींचे पालक मजुरीचं काम करतात. त्यांना आपल्या मुलींना शिक्षण द्यायचं आहे. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे. या निर्णायामुळे मी प्रचंड समाधानी आहे तो आनंद मला शब्दातही व्यक्त करता येत नाही. जेव्हा तुम्ही वंचित, कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षण देता तेव्हा तुम्ही त्यांना सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत असता. मुलींनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यासाठी असंख्य संधी निर्माण होतील. शिवाय कमी वयात लग्न होण्याचे प्रकारही थांबतील".
पुढे अभिनेता म्हणाला, "मला या घडीला याबद्दल सांगताना प्रचंड अभिमान वाटतोय की मी त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली आहे. शिवाय मी तुम्हीदेखील यासाठी तुमचं योगदान द्या, अशी विनंती करतो. डोनेशन किंवा अन्य काही शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना मदत करू शकता. सगळ्यांनी एकत्र येऊन येणारी पिढी घडवूया. चला तर मग या मुलींचं उज्वल भविष्य घडवूया जो त्यांचा अधिकार आहे".