चुकीच्या कोरोना रिपोर्टने मनस्ताप, अभिनेता करण ठक्करला अर्ध्या रात्री काढले हॉटेल बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:19 PM2020-08-23T14:19:14+5:302020-08-23T14:21:11+5:30
चुकीचा कोरोना रिपोर्ट आल्यामुळे टीव्ही अभिनेता व लोकप्रिय टीव्ही होस्ट करण ठक्कर याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
चुकीचा कोरोना रिपोर्ट आल्यामुळे टीव्ही अभिनेता व लोकप्रिय टीव्ही होस्ट करण ठक्कर याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. करण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी अलीकडे आली होती. ही बातमी मीडियात आली आणि यानंतर दिल्लीच्या एका हॉटेलने करणला अर्ध्या रात्री बाहेर काढले. एका ताज्या मुलाखतीत करणने ही आपबीती सांगितली आहे.
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत करणने हा अनुभव शेअर केला. करण एका शूटसाठी दिल्लीला गेला होता. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबईत करणने कोव्हिड टेस्ट केली होती. तो दिल्लीला पोहोचला आणि रात्री उशीरा त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची बातमी मीडियात पसरली. दिल्लीत करण ज्या हॉटेलात थांबला होता, त्या हॉटेलला हे कळताच त्यांनी करणला अर्ध्या रात्री हॉटेलबाहेर काढले. यानंतर 6 तासांनी त्याला आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
करणने हा अनुभव शेअर करताना सांगितले, ‘मी ज्यादिवशी दिल्लीला पोहोचलो, त्याच दिवशी रात्री उशीरा माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. यानंतर मी ज्या हॉटेलात थांबलो होतो, तिथे दहशत पसरली. त्यांनी अर्ध्या रात्री अधिकाºयांना बोलवले. मला हॉटेलबाहेर काढले. अर्ध्या रात्री मला आयसोलेशनला नेण्याची प्रक्रिया सुरु झाली. ही प्रक्रिया 6 तास चालली. पहाटे 3 वाजता मी आयसोलेशन सेंटरमध्ये पोहोचलो. यादरम्यान मला प्रॉडक्शन कंपनीने काहीही मदत केली नाही. त्यांची वागणूक बघून मी हैराण झालो.’
दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह
करणने दोनदा कोरोना टेस्ट केली. दुस-यांदा त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. करणने सांगितले की, मला मुंबईच्या रिपोर्टवर विश्वास नव्हता. कारण माझी चाचणी योग्यप्रकारे झाली नव्हती. कोरोना चाचणीसाठी नाक आणि घसा दोन्हीचा स्वॅब घेतात. मात्र मुंबईत जी व्यक्ती स्वॅबचा नमूना घ्यायला आली होती, तिने केवळ माझ्या नाकाचा स्वॅब घेतला. माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर माझ्या कुटुंबाने दुस-यांना चाचणी केली. आम्हा सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आलेत.