"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:58 PM2024-08-27T12:58:53+5:302024-08-27T12:59:45+5:30

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर मराठी अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे

actor Kiran Mane post on fall of shivaji maharaj statue in malvan sindhudurg | "नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने  शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. अशातच अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिलीय, " प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील... गेली सात दशकं तब्बल एकशेवीसच्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे ! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं भारताचे अत्यंत बुद्धीमान, संवेदनशील, मानवतावादी, देखणे, रुबाबदार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी !"

किरण माने पुढे लिहितात, "झालं असं की, फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही ! त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली. यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: या उद्घाटनाला आले."




किरण माने पुढे लिहितात, "त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. आंदोलनं निदर्शनं सुरू होती. त्यावेळचे सत्ताधारी नेते स्मारकाचे उद्घाटन हा प्रचाराचा 'इव्हेन्ट' समजत नव्हते. त्यामुळे ती आंदोलनं राजकीय ठरवत पंडित नेहरुंनी किंवा यशवंतरावांनी दडपली नाहीत. आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही. पंडित नेहरूंनी स्वत:चा मार्ग बदलून कास पठारमार्गे प्रतापगडावर आले. उद्घाटन केलं.नेहरू संवेदनशील होते. कोडगे नव्हते. त्या स्मारकाच्या उद्घाटनाला येताना मोठ्या प्रमाणावर चाललेले आंदोलन पाहून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आग्रहामागची मराठी माणसाची भावना पंडितजींच्या लक्षात आली. त्यामुळं पंडित नेहरूंचं मनपरिवर्तन होऊ लागलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं मराठी माणसाचं स्वप्न साकार झालं."




किरण माने शेवटी लिहितात, "छत्रपतींचे खरे विचार अंगी बाणलेले तगडे लोक एकत्र आल्यावर असं चिरकाल टिकणारं शिल्प तर उभं रहातंच... पण काळाच्या कसोटीवर भक्कमपणे उभं राहून झळकणारं देशहिताचं कार्यसुद्धा हातून घडतं ! ..."हे मी केलं, हे मी केलं." सांगण्यासाठी घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहीरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी उघडे पडतातच. कसोटीच्या काळात आनि काळाच्या कसोटीत तोच टिकतो, जो 'सच्चा' आहे. जय शिवराय...जय भीम."

Web Title: actor Kiran Mane post on fall of shivaji maharaj statue in malvan sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.