चला हवा येऊ द्या: अमृता खानविलकरचा जीव जाता जाता राहिला; कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:43 PM2023-03-12T12:43:27+5:302023-03-12T12:44:16+5:30
Kushal badrike: अलिकडेच कुशलने इन्स्टाग्रामवर च'ला हवा येऊ द्या'च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला.
छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज घराघरात ओळखला जातो. त्यातलाच एक लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). कलाविश्वात सक्रीय असलेला कुशल सोशल मीडियावरही सक्रीय असून तो वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. अलिकडेच त्यांने अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar)हिच्याविषयी पोस्ट शेअर केली. यात अमृताचा जीव जाता जाता राहिला, असं त्याने म्हटलं आहे. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
अलिकडेच कुशलने इन्स्टाग्रामवर 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये शोच्या मंचावर अमृता खानविलकर, सायली संजीव, ऋता दुर्गुळे, रवी जाधव ही कलाकार मंडळी उपस्थित असल्याचं दिसून आलं. यावेळी कुशलने 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे त्याने सादर केलेल्या डान्समुळेच अमृताचा जीव जाता जाता राहिला असं मजेशीर अंदाजात त्याने म्हटलं.
कुशलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो स्त्री पात्राच्या वेशात चंद्रा या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तो फूल एनर्जीने डान्स करत असल्याचं लक्षात आलं. परंतु, नाचायच्या भरात तो स्टेजवरुन जोरात खाली पडला. कुशलला खाली पडलेलं पाहून अमृता पटकन तिच्या खुर्चीवरुन उठली आणि उभी राहिली. विशेष म्हणजे यावेळी त्याला विनोद सुचला. “चंद्रावरचा खड्डा मध्ये आल्याने मी पडलो,” असं म्हणत त्याने पुन्हा त्याचं स्कीट सुरु ठेवलं.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत त्याने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. “अमृता खानविलकरने केलेला चंद्राचा डान्स वाटतो तितका सोपा नाही बरं, आमच्या स्नेहल शिदमचा जवळ जवळ “जीव गेला” मला शिकवता शिकवता. शेवटी माझा नृत्याविष्कार बघून अमृताचाही जीव जाता जाता राहिला. एकदा अजय-अतुल यांना प्रत्यक्ष करुन दाखवेनच म्हणतोय माझा डान्स.” आता त्याचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.