'एका डोंबाऱ्या बरोबर ३४वर्ष संसार...', लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:23 PM2024-05-27T12:23:40+5:302024-05-27T12:24:37+5:30

अभिनेते मिलिंद गवळी यांनी पत्नीसोबतच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर केला.

actor Milind Gawali post for his wife on their 34th wedding anniversary | 'एका डोंबाऱ्या बरोबर ३४वर्ष संसार...', लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट

'एका डोंबाऱ्या बरोबर ३४वर्ष संसार...', लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. उत्तम अभिनयासह ते त्यांच्या लिखाणामुळेही चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर सक्रीय असलेले मिलिंद गवळी कायम सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमध्ये ते त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडी शेअर करतात. यावेळी त्यांनी ३४व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलिंद गवळी यांनी पत्नी दिपासोबतच्या खास फोटोंचो व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर कॅप्शन देत त्यांनी लिहलं, 'एका डोंबाऱ्या बरोबर ३४ वर्ष संसार सुरू आहे”. आज आमच्या लग्नाला ३४ वर्ष पूर्ण झाली. माझ्या बहिणीने शेगावच्या गजानन महाराजांकडे नवस बोलला होता, माझा भाऊ मिलू जर दहावी पास झाला तर मी त्याला शेगावला दर्शनाला घेऊन येईन आणि कदाचित शेगावच्या गजानन महाराजांमुळे मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ४७ टक्के मार्काने उत्तीर्ण झालो, अकरावीला गेलो , आई म्हणाली की जळगावला देशमुखांच्या घरचं लग्न आहे, ते लग्न attend करून, आपण मिलू चा नवस फेडायला शेगावला जाऊया'.

पुढे त्यांनी लिहलं, 'मी म्हणालो मला नाही यायचं जळगाव बीळगावला, आई म्हणाली नवस आहे, तो तर फेडावाच लागतो, पहाटे आमची एसटी जळगावला पोहोचली, लग्न घरी पोहोचलो आणि समोर एक अतिशय सुंदर मुलगी मला दिसली, आईला म्हटलं की ती लांब केसांची लाल ड्रेस मधली जी मुलगी आहे, तिच्याशी मला लग्न करायचं, आयुष्यभर आईने माझे हट्ट पुरवले, तसाच हा सुद्धा हट्ट तिने पुरवला. आईने लगेच तिच्या घरच्यांना सांगितलं मला ही मुलगी सून म्हणून पसंत आहे. मुलांचं लग्नाचं वय झालं की आपण या दोघांच्या लग्नाचा विचार करूया'.

ते लिहतात, 'माझे आई वडील दोघेही अतीशय प्रेमळ, आणि हे सगळ्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांना खात्री होती आपली दिपूली त्या घरात सुखात राहील, आणि मुलगा मोठा झाल्यावर काय ना काहीतरी काम धंदा करेलच, पण त्यांना कुठे कल्पना होती, की मुलगा भविष्यात डोंबाऱ्याचा खेळ करत करत गावगाव भटकत राहणार आहे. 26 मे 1990 साली आमचं लग्न झालं. आज त्याला 34 वर्ष पूर्ण झाली, त्या वेळेला बिचारी दिपा तिला कल्पनाही नसेल एका कलाकाराबरोबर संसार करायचा म्हणजे किती खडतर प्रवास असणार आहे, अगदी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यां सारखाच'.

मिलिंद यांनी पुढे लिहलं, 'मी मराठी सिनेमांमध्ये काम करत करत सातारा कोल्हापूर सांगली अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली बेळगाव पुणे नाशिक बीड लातूर संभाजीनगर जळगाव या ठिकाणी shooting करत होतो, आपला नवरा सतत फिरत राहणार आहे याची त्या बिचारीला कल्पनाच नव्हती. आजही गेली साडेचार वर्ष घरदार सोडून ठाण्यामध्ये राहते आहे, कुठल्याही परिस्थितीत adjust करत असते, एका कलाकाराबरोबर आयुष्य काढणं म्हणजे काय साधी सरळ गोष्ट आहे का? दिपाला stability, security नसताना , सतत हसत खेळत प्रसन्न राहून मला साथ देत राहिली.

'मी पण हा प्रवास तिच्या साथीने तिच्यासोबत करत आलो आहे, तिची साथ सोबत नसती तर इतक्या लांबचा पल्ला गाठूच शकलो नसतो,
३४ वर्षाचा एकत्र प्रवास साधा सरळ सोपा तिच्यासाठी नव्हता, मला भक्कम साथ दिल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे, आणि ३४ साव्या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिपा तुला खूप खूप शुभेच्छा', या शब्दात मिलिंद गवळी यांनी लाडक्या बायकोला लग्न वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

Web Title: actor Milind Gawali post for his wife on their 34th wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.