अभिनेता नागेश भोसलेंची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, अभिनयाव्यतिरिक्त करतात हे कौतुकास्पद काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 06:00 AM2022-05-07T06:00:00+5:302022-05-07T06:00:01+5:30
Nagesh Bhosle: 'देवयानी' फेम नागेश भोसले यांच्या पत्नीदेखील अभिनेत्री आहेत, हे फार कमी लोकांना माहित आहे.
छोट्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते नागेश भोसले (Nagesh Bhosle) यांनी देवयानी मालिकेत साकारलेली सर्जेराव विखे पाटीलची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती. अनेक मालिकांसोबत नागेश यांनी 'चिंटू २', 'प्यार वाली लव्ह स्टोरी', 'दुनियादारी', 'धग', 'गावठी', 'योद्धा', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत 'मुजरा' आणि 'पन्हाळा' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मराठीसह नागेश भोसले 'शूल', 'सरकार', 'क्यूँ की', 'डी', 'आखरी डिसीजन', 'दम', 'बर्दाश्त' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही झळकले आहेत. लवकरच ते तमाशा या आगामी चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, नागेश भोसले यांच्या पत्नीदेखील अभिनेत्री आहेत, हे फार कमी लोकांना माहित आहे.
नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या देखील अभिनेत्री आहेत. विजय कदम सोबत त्यांनी सहकलाकाराची भूमिका केली होती. ‘जॉय कलामंच’ या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी कळत नकळत, पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर जॉय भोसले या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.
राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी लहानपणापासून मुंबईची झोपडपट्टी आहे तशीच आहे त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही याच हेतूने समाजात काहीतरी बदल घडवून आणावेत म्हणून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली असली तरी आजही त्या सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत.
जॉय भोसले आणि नागेश भोसले यांना दोन मुले आहेत. ते सिनेइंडस्ट्रीत नाही तर वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. नागेश भोसले यांची लेक कुहू फिटनेसला पहिले प्राधान्य देताना दिसते. अँथलेट, वुमन्स बॉडिबिल्डिर आहे या क्षेत्रात तीने आपला जम बसवला आहे. २०२१ साली स्त्री शक्ती पुरस्काराने कुहूला सन्मानित करण्यात आले होते.