कुणी 300 रुपये तरी द्या मला... असं म्हणण्याची वेळ आलीय 'बेगुसराय' मालिकेतील अभिनेत्यावर, व्हिडिओतून मांडल्या व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 11:46 AM2020-06-03T11:46:56+5:302020-06-03T11:47:55+5:30
आर्थिक तंगीत अडकलाय हा अभिनेता, म्हणतोय मला जगायचं आहे, मदत करा
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प झालं आहे. तसेच सिनेमा, मालिकांचेही शूटिंग बंद आहे. त्यामुळे अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. छोट्या पडद्यावरील मालिका बेगुसरायमध्ये शिवांगी जोशीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेता राजेश धरस उर्फ राजेश करीर यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी एक इमोशनल व्हिडिओ शेअर करत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी लोकांना आर्थिक मदत करण्याचेही आवाहन केले आहे.
अभिनेता राजेश करीर व्हिडिओत म्हणाले की, मित्रांनो, मी राजेश करीर. कलाकार आहे, बरेच लोक मला ओळखत असतील. ही गोष्ट आहे की जर मी लाजेन तर मला जगणं कठीण होईल असं मला वाटतंय. मला एवढीच विनंती करायची आहे की, मला मदतीची खूप गरज आहे. अवस्था खूपच नाजूक झाली आहे. तुम्ही 300, 400, 500 रुपये जेवढे शक्य असतील मला मदत करा. शूटिंग कधी सुरू होईल काहीच माहिती नाही. काम मिळेल किंवा नाही काहीच माहिती नाही. लाइफ एकदम ब्लॉक झाली आहे. काहीच समजत नाही. मला जगायचं आहे.'
बोलताना त्यांचे डोळेही पाणावत आहेत. त्यांनी सोबत बँक खात्याचा तपशील आणि मोबईल नंबरही दिला आहे.
बेगुसराय या मालिकेचं प्रसारण 2015-16 सालच्या दरम्यान सुरू झाले होते. या शोमध्ये श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंग हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते.