संकर्षणने आजोबांच्या अकाऊंटमधून काढले होते ३०० रुपये; चोरी पकडली गेली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:24 PM2023-12-29T12:24:00+5:302023-12-29T12:24:51+5:30
Sankarshan karhade: संकर्षणनेच वडील बँकेत असल्यामुळे त्यांना हा प्रकार लवकर कळला
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी, सूत्रसंचालक अशा एकाच वेळी विविधांगी भूमिका पार पाडणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). उत्तम अभिनयशैली आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांच्या जोरावर संकर्षणने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते.नुकतीच संकर्षणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्याने लहानपणी आजोबांच्या अकाऊंडमधून पैसे काढल्याचा किस्सा सांगितला.
अलिकडेच संकर्षणने वायफळ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या लहानपणीचे अनेक किस्से शेअर केले. विशेष म्हणजे यावेळी बोलत असताना त्याने एकदा आजोबांच्या अकाऊंटमधून गुपचूप ३०० रुपये काढले होते. आणि, याविषयी त्याच्या घरी कळल्यावर एक मजेशीर किस्सा घडला होता हे सुद्धा त्याने सांगितलं.
"माझे वडील बँकेत होते त्यामुळे त्यांच्यासमोर ज्या व्यक्तीचं अकाऊंट आहे त्याची पूर्ण कुंडली समोर दिसायची. मला एक दिवस माझ्या आजोबांनी ATM मधून ५०० रुपये काढून आणायला सांगितले. मी ATM मध्ये गेलो आणि पहिले ३०० रुपये काढले. त्यानंतर जी पावती आली ती फाडून टाकली. मग, पुन्हा ५०० रुपये काढले आणि जी पावती होती ती घेऊन घरी गेलो. आजोबांना ५०० रुपये आणि पावती दिली. आधी काढलेले ३०० रुपये माझ्या खिशात", असं संकर्षण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "बाबा जेव्हा बँकेतून घरी आले त्यावेळी त्यांनी आजोबांना विचारलं की, आज तुम्ही ८०० रुपये कशासाठी काढले? हा प्रश्न ऐकून मला ३०० रुपयांचा घाम फुटला. आजोबांनाही पटकन कळेना. पण, त्यांनी बाबांच्या होकारात होकार मिळवला आणि कामासाठी ८०० रुपये काढले असं सांगितलं. त्यानंतर बाबा आत गेल्यानंतर आजोबांनी एक शिवी हासडली आणि मला बोलावलं. आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे याचं तरी भान ठेवा!” , असं आजोबा मला म्हणाले.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये संकर्षणने त्याच्या बालपणीचे अनेक किस्से सांगितले. सोबतच त्याच्या करिअरविषयी देखील भाष्य केलं. संकर्षण सध्या तू म्हणशील तसं या नाटकाचे प्रयोग करत आहे.