"मोठमोठे दिग्गजही प्रोत्साहन देत आहेत...", रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह जोकवर अभिनेता भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:19 IST2025-02-10T14:17:01+5:302025-02-10T14:19:25+5:30
कॉमेडियन्सने अतिशय खालची पातळी गाठल्यावरुन काही सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे.

"मोठमोठे दिग्गजही प्रोत्साहन देत आहेत...", रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह जोकवर अभिनेता भडकला
कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेन्ट' (India's Got Latent) अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. त्यातील अश्लील जोक याआधीही व्हायरल झाले आहेत. यावरुन समय रैनावर बरीच टीकाही झाली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या एका एपिसोडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) हजेरी लावली. यावेळी रणवीरने समय रैनालाही मागे टाकत आक्षेपार्ह जोक केला आहे. याची दखल आता प्रशासनानेही घेतली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉमेडियन्सने अतिशय खालची पातळी गाठल्यावरुन काही सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे.
'महाभारत' मालिकेत श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता सौरभ जैनने (Sourabh Raaj Jain) सोशल मीडियावर काही ओळी लिहित राग व्यक्त केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले,"एकानंतर एक सगळेच खालची पातळी गाठत आहेत, विनोदाच्या नावाखाली घाण पसरवत आहेत...वास्तव सांगत असताना असभ्यता अगदीच सामान्य मानली जात आहे...आणि आता तर काय मोठमोठे दिग्गजही यांना प्रोत्साहन देत आहेत."
मराठी संगीतकार कौशल इनामदार (Kaushal Inamdar) यांनीही याप्रकरणी सोशल मीडियावर मत मांडत लिहिले, "या लोकांवर फार टिप्पणी करावी असं काही नाही, पण आपल्या आजूबाजूच्या समाजात कुणाला आर्थिक यश मिळतं, कोण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतं, कोण सतत प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात राहतं हा समाजाच्या दृष्टिनं चिंतेचा विषय वाटतो. त्यात आपण सवंग लोकप्रियतेची वाट न धरता काही गंभीर करण्याचा प्रयत्न करत असू तर मनाला एक प्रकारची उदासी आल्याशिवाय राहात नाही. मी हल्ली बऱ्याचदा गंमतीने म्हणतो की फ्रस्ट्रेशन येऊ न देणं हा माझा पूर्ण वेळ उद्योग आहे आणि मग अधूनमधून मी गाणीही करतो!
हा केवळ बाष्कळपणा आहे असं नाही. हे लोक आत्ता समाजात यशस्वी मानले जातात. एखादा वाद पेटला तरी यांना त्याचा फायदाच होतो. आर्थिक यश यांनाच मिळतं. यूट्यूब फॉलोअर्स यांनाच मिळतात. येन केन मार्गाने यांना झोतात रहायचं असतं पण खरी शोकांतिका ही आहे की येन केन मार्गाने समाज यांनाच झोतात ठेवतो. कुठल्याही प्रकारच्या गंभीर कामासाठी लोकप्रियतेचे हे शॉर्टकट्स घेता येत नाहीत हे सतत स्वतःला समजावत रहावं लागतं. आपण कशाला उत्तेजन देतो? कुणाला प्रोत्साहन देतो? कुणाला उपेक्षित ठेवतो. या सगळ्यावर समाज म्हणून आपली किंमत ठरत जाणार आहे."
यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया विरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये अश्लील विधाने केल्याबद्दल वकील आशिष राय आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अश्लील विधाने करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.