Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या' शोमधून या प्रसिद्ध कलाकाराने घेतली एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:04 IST2023-01-11T13:59:18+5:302023-01-11T14:04:13+5:30
‘चला हवा येऊ द्या’ हा शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आता या शोमधून एका कलाकाराने निरोप घेतला आहे.

Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या' शोमधून या प्रसिद्ध कलाकाराने घेतली एक्झिट
नमस्कार मंडळी, हसताय ना... हसायलाच पाहिजे, असं म्हणत दीर्घकाळापासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा झी मराठीवरचा ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा प्रेक्षकांचा अतिशय लाडका कार्यक्रम. सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) आणि श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. दरम्यान आता या लोकप्रिय शोमधून एका अभिनेत्याने निरोप घेतल्याचं समोर आलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजपर्यंत अनेक सेलिब्रिटी आले.अगदी मराठीसह बॉलिवूड, टॉलिवूडचे कलाकारही या मंचावर दिसले. या कलाकारांनाही या शोने खळखळून हसवलं. या शोमधून एका कलाकाराने आता निरोप घेतला आहे. खरं तर या शोमधून कोणत्याही विनोदी अभिनेत्याने नव्हे तर परिक्षकाने निरोप घेतला आहे.
ऐवढ्यात तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते. होय, 'चला हवा येऊ द्या' स्वप्निल जोशीने एक्झिट घेतली आहे. स्वप्निल जोशी या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत होता. मनोरंजन मराठीच्या इन्स्टा पेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. मात्र स्वप्निलने हा शो का सोडला या मागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
स्वप्निल जोशी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती तो सोशल मीडियावर प्रेक्षकांना देत असतो. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो छोट्या पडद्यावरील तू तेव्हा तशी मालिकेत पाहायला मिळतो आहे. या मालिकेत त्याने साकारलेला सौरभ प्रेक्षकांना खूप भावला आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.