अभिनेत्री आशा नेगी दिसणार ‘ख्वाबों के परिंदे’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:12 PM2021-06-03T20:12:00+5:302021-06-03T20:13:01+5:30
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशा नेगी लवकरच ‘ख्वाबों के परिंदे’ या सीरिजमध्ये दिसणार आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशा नेगी लवकरच ‘ख्वाबों के परिंदे’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज वूटवर भेटीला येणार आहे. ही सीरिज तीन मैत्रिणी- बिंदिया, दीक्षित आणि मेघा यांच्यावर आधारीत आहे. मेलबर्न युनिव्हर्सिटीतून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर एक मस्तीखोर मुलगी असलेली बिंदिया आपल्या सर्वांत विश्वासू मैत्रिणींना मेलबर्न ते पर्थ या अत्यंत महत्वाकांक्षी व धमाल रोड ट्रिपवर आपल्यासोबत येण्यासाठी तयार करते. ही ट्रिप बिंदियासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण भारतात परत येऊन आपल्या जबाबदाऱ्या घेण्यापूर्वी आपल्या आयुष्याचा आनंद घेण्याची तिची ही शेवटची संधी ठरू शकेल.
याबाबत आशा नेगी म्हणाली की, “ख्वाबों के परिंदे हा आयुष्य आणि आशेचा प्रवास आहे. पण कधी-कधी तुम्हाला स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी जवळच्या मित्रांची गरज पडते. या शोमधील माझी व्यक्तिरेखा असलेली बिंदिया ही खूप मस्तीखोर मुलगी आहे. तिला आपल्या आयुष्याचा दररोज आनंद घ्यायला आवडते. तुम्ही अशा प्रकारच्या शोसाठी चित्रिकरण करता तेव्हा तुमच्या जवळच्या मित्रांसोबत या क्षणांचा नव्याने आनंद घ्यायचा प्रयत्न करता आणि मीही तेच केले. तथापि, काही काळानंतर मृणाल, मानसी, तुषार व माझे खूप चांगले संबंध निर्माण झाले आणि फक्त सहकारी असण्याबरोबरच आम्ही चांगले मित्रही झालो. त्यामुळे हा प्रवास आकर्षक झाला. शोसाठी चित्रिकरणाच्या संपूर्ण अनुभवाने मला मित्रांचे महत्त्व जाणवले आणि तुमच्याभोवती मित्र असणे का महत्त्वाचे आहे हेही कळले. ते तुमच्या ट्रूथ सिरमसारखे आहेत. ते तुम्हाला तुमची अत्यंत खोलवर दडलेली रहस्ये बाहेर आणायला आणि नंतर त्यातून तुम्हाला बाहेर पडायला मदत करतात.”
ती पुढे म्हणाली की, “या खूपच छान युवा क्रूसोबत ऑस्ट्रेलियामध्ये चित्रिकरणाचे ६० दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला आणि मला अगदी एका क्षणात त्यात परत जायला आवडेल. मला बिंदियाची भूमिका करायला खूप मजा आली. ही भूमिका आव्हानात्मक असली तरी टीव्हीपासून वेबपर्यंत भूमिकांमधील माझे काम अत्यंत आनंददायी होते. माझे रॉकस्टार दिग्दर्शक तपस्वी मेहता आणि वूट यांचे आभार मी मानते, कारण त्यांनी मला ही एक अशी संधी दिली जिने मला एक कलाकार म्हणूनच नाही तर व्यक्ती म्हणूनही आव्हान दिले.”
‘ख्वाबों के परिंदे’ जून महिन्यात केवळ वूटवर पहायला मिळणार आहे.