सुशांतसिंह राजपूतच्या केसवेळी मत व्यक्त केल्याने काम मिळणंच बंद झालं, अभिनेत्रीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:13 IST2025-03-31T17:13:04+5:302025-03-31T17:13:38+5:30
सुशांतबद्दल तेव्हा काही कलाकार व्यक्त होत होते. तर काही जण फक्त लाईमलाईटसाठी बोलत असल्याचाही आरोप झाला. असाच आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला होता.

सुशांतसिंह राजपूतच्या केसवेळी मत व्यक्त केल्याने काम मिळणंच बंद झालं, अभिनेत्रीचा खुलासा
२०२० साली कोरोना काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतने (Sushantsingh Rajput) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं यावरुन बऱ्याच चर्चा झाल्या. याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सीबीआयनेही या प्रकरणाचा तपास केला आणि अखेर ती हत्या नाही तर आत्महत्याच होती हे समोर आलं. सुशांतबद्दल तेव्हा काही कलाकार व्यक्त होत होते. तर काही जण फक्त लाईमलाईटसाठी बोलत असल्याचाही आरोप झाला. असाच आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला होता.
'कैसी ये यारियां' मालिकेत दिसलेली अभिनेत्री क्रिसन बैरेटोने (Krissann Barretto) नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला. ती म्हणाली, "या देशात जर तुम्ही कलाकार आहात तर तुम्ही शोक व्यक्त करु शकत नाही. जर तुमच्या मित्राचं निधन झालं आणि तुम्ही शोक व्यक्त केला तर लोकांना असंच वाटतं की तुम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी करत आहात. तुम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत आहात म्हणजे तुम्ही परफॉर्मच करत आहात असंच त्यांना वाटतं. यात खऱ्या भावनेला जागाच नाही."
ती पुढे म्हणाली,"सुशांतसिंह राजपूतच्या हाय प्रोफाइल केसमध्ये बोलणं फार मोठी गोष्ट होती. कोणीही याबद्दल बोलत नव्हतं कारण हे रिस्की होतं. मी माझं करिअर, आयुष्य धोक्यात टाकलं. इतकंच नाही तर माझे आईवडीलही मी त्याबद्दल बोलल्यामुळे माझ्यावर रागावले. लक्ष वेधून घेण्यासाठी एवढी मोठी रिस्क घ्यायला कोणीही एवढा मूर्ख नसतो. जेव्हा तुम्ही आवाज उठवता तेव्हा तुमच्यासाठी किती दरवाजे बंद होतात याचा कोणाला अंदाज येत नाही. माझ्यासोबतही तेच घडलं. मी सुशांतच्या केसबद्दल बोलले म्हणून नंतर मला काम मिळत नव्हतं, नकार यायचे. मी बरंच काही गमावलं. मी माझ्या मित्रासाठी केलं प्रसिद्धीसाठी नाही. त्यामुळे मला काही गमावल्याचा फरक पडत नाही. मला मित्रांनीही बोलण्यापासून थांबवलं होतं. पण मी शांत बसू शकले नाही."