अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा 'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान, आनंद व्यक्त करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 07:19 PM2023-12-21T19:19:24+5:302023-12-21T19:21:15+5:30

मधुराणी प्रभुलकरचा ठाणे महानगरपालिकेतर्फे  'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Actress Madhurani Prabhulkar honored with 'Ganga Jamuna' award | अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा 'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान, आनंद व्यक्त करत म्हणाली...

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा 'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान, आनंद व्यक्त करत म्हणाली...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.  इतकंच नाही तर मधुराणी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतेच मधुराणी प्रभुलकरचा ठाणे महानगरपालिकेतर्फे  'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यानिमित्ताने तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मधुराणीने पोस्टमध्ये म्हटले, 'जनकवी पी. सावळाराम कला समिती आणि ठाणे महानगरपालिका ह्यांच्या तर्फे दिला जाणारा 'गंगा जमुना' पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला. तो ही ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके , ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार सर, प्रा. मंदार टिल्लू आणि निवेदिका सानिका कुलकर्णी ह्या चतुरस्त्र मंडळींसमवेत..!! कविता आणि कवी ह्यांची माझ्या हृदयात एक खास जागा असताना कवीच्या नावे पुरस्कार मिळणं हे फार काव्यत्मकच वाटतंय'.

पुढे ती लिहते, 'विठू माझा लेकुरवाळा, धगा धागा अखंड विणूया, पंढरीनाथा झडकरी आता, अशी पी .सावळाराम ह्यांची कितीतरी गाणी आईनी मला लहानपणी शिकवली. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना वर्तुळ पूर्ण झाल्याचा भास झाला. आणि ठाणे ही गेली ४ वर्ष माझी कर्मभूमी आहे. ज्या मालिकेने मला घराघरात आणि रसिकांच्या मनात पोहचवलं त्याचं शूट ठाण्यात चालतं. त्यामुळे गेली 4 वर्ष मी ठाणेकरच आहे'.

'ठाणेकरांच्या रासिकतेविषयी आम्हा कलाकारांमध्ये कायम चर्चा असते आणि ती रसिकता अगदी खुर्चीतल्या मंडळींकडे सुद्धा आहे, हे मी वेळोवेळी अनुभवलं. त्याचंच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ठाण्याचे माजी महापौर नरेशजी म्हसके! एका कार्यक्रमात मी गायलेल्या गझलचा आवर्जून उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला, ह्यातच सारं आलं. आशा दिलखुलास व्यक्तीकडून पुरस्कार स्वीकारणं आणखीनच संस्मरणिय होत', असेही तिने म्हटलं. 

'वर्ष सरताना, दरवर्षी मला सरलेल्या वर्षाचा मनातल्या मनात जमाखर्च मांडायची सवय आहे. ह्या पुरस्काराने जमेची बाजू इतकी वाढली की बाकी सर्व दुखऱ्या खर्चाच्या बाजू दिसेनश्याच झाल्या. माझ्या संपूर्ण प्रवासात मला साथ देणाऱ्या, प्रेम देणाऱ्या, मला सांभाळून, समजून घेणाऱ्या, माझ्या चूका दाखवत मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येकीला मी हा सन्मान अर्पण करते', या शब्दात मधुराणीने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

मधुराणी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली कवयित्रीदेखील आहे. मधुराणी बऱ्याचदा तिच्या कविता वाचनाचा कार्यक्रम करत असते. मधुराणीने आतापर्यंत अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: Actress Madhurani Prabhulkar honored with 'Ganga Jamuna' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.