अभिनेत्री स्पृहा जोशीची नवीन मालिका 'सुख कळले', या दिवशी येतेय भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 20:17 IST2024-03-26T20:17:22+5:302024-03-26T20:17:42+5:30
Spruha Joshi : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या चर्चेत आली आहे. ती बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. लवकरच ती कलर्स मराठी वाहिनीवरील सुख कळले या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशीची नवीन मालिका 'सुख कळले', या दिवशी येतेय भेटीला
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सध्या चर्चेत आली आहे. ती बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. लवकरच ती कलर्स मराठी वाहिनीवरील सुख कळले या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहे. ही मालिका २२ एप्रिलपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’ सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी, त्यांच्या निखळ, निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’
२२ एप्रिलला कलर्स मराठीवर दाखल होतेय. याचा पहिलाच गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आलाय. आणि माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय. या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली असून सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत.